परराष्ट्र धोरण - (Foreign Policy)


परराष्ट्र धोरण - (Foreign Policy)
एका राष्ट्राचे जगातील इतर राष्ट्रांशी असलेल्या संबंधांना त्या राष्ट्राचे बाह्य संबंध असे म्हणतात. कोणत्याही राष्ट्राचे बाह्य संबंध विशिष्ट तत्त्व आणि धोरणांवर आधारित असते. या सर्व तत्त्वांना आणि धोरणांना परराष्ट्रीय धोरण म्हणून ओळखले जाते. अशा प्रकारे बाह्य जगातील इतर राष्ट्रे तसेच आतंरराष्ट्रीय प्रादेशिक संघटना यांच्याशी संबंध ठेवतांना केलेल्या कृतींना एकत्रितपणे परराष्ट्र धोरण म्हणतात.
भारताच्या परराष्ट्र धोरणाचा उगम आणि विकास
भारताच्या परराष्ट्र संबंधांना भारताइतकाच प्राचीन इतिहास आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडात भारताचे उर्वरीत जगाशी अत्यंत सौहार्दाचे संबंध होते. मात्र भारतात ब्रिटीश सत्तेवर आल्यानंतर या संबंधात आमूलाग्र बदल घडून आले. ब्रिटीशांचे परराष्ट्र धोरण वसाहतवाद हेतूने प्रेरित होते त्यामुळे राष्ट्रवादी नेत्यांनी अशा धोरणावर टीका केली आणि राष्ट्रीय सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि शातंतापूर्ण सहअस्तित्व ता गोष्टींवर आधारित परराष्ट्र धोरणाची मागणी केली.
त्यामुळे भारताने स्वातंत्र्यानंतर आपल्या पारतंत्र्याच्या कालखंडातील कटु आठवणींपासून बोध घेऊन आपले परराष्ट्रीय धोरण तयार केले. भारताचे पहिले पं. जवाहरलाल नेहरू हे या परराष्ट्र धोरणाचे मुख्य शिल्पकार होते. तेव्हापासून आजतागायत भारताने नेहरूंचेच परराष्ट्र धोरण थोड्या बहुत बदलांसह कायम ठेवले आहे.
भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची तत्त्वे
१)      अलिप्ततावाद (Non Alignment)
नेहरूंनी अलिप्ततावाद हे भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे मुख्य सूत्र ठरवले. भारत हा वसाहतवादचा बळी ठरला होता. जो भांडवलवादातून उद्‍भवला होता. आणि साम्यवादातील अतिरेक भारतीयांच्या पचनी पडण्याजोगा नव्हता. त्याचबरोबर नुकतेच स्वातंत्र्यप्राप्ती झाल्यानंतर भारताला गटा-गटाच्या राजकारणापेक्षा सामाजिक आणि आर्थिक विकासाकडे लक्ष देणे सर्वाधिक गरजेचे होते. या अलिप्ततावादाच्या धोरणामुळे भारताला प्रत्येक स्रोताकडून आर्थिक मदत मिळविणे शक्य झाले. त्याच बरोबर भारताच्या नेतृत्त्वाखाली अलिप्त राष्ट्रांच्या मोठ्या गटाने भांडलवाद-समाजवाद या संघर्षापासून दूर राहणे प्संत केले.
२)      वसाहतवाद आणि साम्राज्यवादाला विरोध (Anti Colonialism and Anti Imperialism )
भारताला वसाहतवादातील शोषण चांगलेच माहिती होते. त्यामुळे भारताला जगात वसाहतवाद कोणत्याही रूपात अस्तित्वात नसावा असे वाटत होते. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर वसाहतवाद आणि साम्राज्यवादा विषयीचे भारताचे धोरण असहिष्णुतेचे राहिले. भारताने आशिया, लॅटिन, अमेरिका व आफ्रिकेतील राष्ट्रांच्या निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेत उत्साह दाखवला तसेच इंडोनेशिया, लिबिया, मोरोक्को, अल्जेरिया या देशांच्या मुक्ती चळवळींना पाठिंबा दिला. भारताने आर्थिक साम्राज्यवादाचे एक रूप असलेल्या नव वसाहवादालादेखील विरोध केला. आणि समानता व पारदर्शकता यावर आधारित एक नवीन आतरराष्ट्रीय आर्थिक क्रमाची [New International Economic Order (NIEO) ] मागणी केली.
३)      वर्णद्वेषविरोध (Anti Racism)
ब्रिटीशांच्या अधिपत्याखालील भारत वर्णद्वेषाचा बळी ठरला होता. त्यामुळे स्वतंत्र भारताने वर्णभेदाला कडाडून विरोध करण्याचे व वर्णद्वेष नष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे धोरण अवलंबले. दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषी सरकारविरोधात जागतिक पातळीवर मोठा विरोधी गट उभारण्यात भारताचा सिंहाचा वाटा होता.
४)      जागतिक पातळीवर शांततेला उत्तेजन (Promotion of World Peace)
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (UNO) शांतता आणि विकासाच्या तत्त्वावर भारताचा पूर्ण विश्वास आहे. शांततेशिवाय मानव जातीचा विकास अशक्य आहे. युनोचा सदस्य म्हणून भारताने अनेक प्रसंगी तणाव कमी करण्यास मदत केली आहे. उदा. कोरियन युद्ध (१९५०), भारत-चीन पेचप्रसंग (१९५४), सुएझ पेचप्रसंग (१९५६) आणि कंगोची समस्या (१९६०). भारताने संयुक्त राष्ट्रांच्या कांगो, अंगोला, सायप्रस, गाझा येथील शांतता मोहिमेत आपल्या सैन्यासह सक्रिय सहभाग घेतला आहे.

५)      चांगला शेजार आणि प्रादेशिक सहकार्य (Good neighborhood and Regional Co-operation)
भारताने नेहमीच द्वीस्तरीय आणि प्रादेशिक स्तरावर इतर राष्ट्रांशी चांगले संबंध राखण्याचा प्रयत्न केला आहे. दक्षिण आशियात प्रादेशिक सहकार्य वाढविण्यासाठी १९८५ साली सार्कची (SAARC) स्थापना करण्यात भारताने पुढाकार घेतला. भारताने “गुजराल धोरणा” अंतर्गत शेजारील गरीब देशांना विविध भरघोस सवलती देऊ केल्या.

६)      नि:शस्त्रीकरणाला पाठिंबा (Support for disarmament )
संपूर्ण, समावेशक आणि जागतिक नि:शस्त्रीकरण हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचे तत्व होते. भारताने नेहमीच अण्वस्त्रांच्या नष्ट करण्यच्या धोरणाचा पाठपुरावा केलेला होता.

७)      संयुक्त राष्ट्रांवर संपूर्ण विश्वास (Full Faith on UN )
भारत संयुक्त राष्ट्रसंघाचा एक संस्थापक सदस्य आहे. याशिवाय भारताने अनेक शांतता मोहिमांत सक्रिय सहभाग घेतला. तसेच संयुक्त राष्ट्राने निधी पुरविलेल्या व युनेस्को, युनिसेफ सारख्या संघटनांनी चालवलेल्या अनेक कार्यक्रमात भारताने सहभाग नोंदविला.

८)      राष्ट्रकुलाशी सौहार्दाचे संबंध (Intimate relation with Commonwealth )
भारताने राष्ट्रकूल संघटनेत सभासदत्व मिळावले कारण हे देशाच्या आर्थिक आणि इतर क्षेत्रांच्याकरिता महत्त्वाचे ठरणार होते.  



भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे (Objectives of Indian Foreign Policy)
आजपर्यंत संपूर्ण कालखंडात भारताने काही प्रसंगानुरूप बदलांसह एकाच/एकसमान परराष्ट्र धोरणाच्या तत्त्वांचा अवलंब केला आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे पाहू.
१)      राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे संरक्षण (Preservation of National Sovereignty and Territorial Integrity )
२)      स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचा अवलंब (Adaptation of Independent Foreign Policy )
३)      आतरराष्ट्रीय शांततेला उत्तेजन (Promotion of International Peace )
४)      भारतीय वंशाच्या नागरिकांच्या हितसंबंधांचे संरंक्षण (Protection of the interests of the people of Indian Region )
५)      तिसऱ्या जगातील देशांच्या हितसंबंधांचे संरक्षण (Protection of the Interests of the Third World Countries)
६)      अवलंबित लोकांचे स्वातंत्र्य आणि वंशाच्या आधारावरील भेदभावाचे उच्चाटन (Freedom of dependent people and elimination of racial discrimination )