Friday, February 3, 2012

विपणन

प्रस्तावना
विज्ञानाच्या प्रगतीनुसार उत्पादन प्रक्रियेतही खूप काही बदल झाले. उत्पादित केलेली वस्तू उपभोग्य व्हावी यासाठी प्रयत्न केले जाऊ लागले. उत्पादित केलेल्या वस्तुला स्थळ, वेळ व स्वरुप इ. उपयोगिता मिळावी म्हणुन मोठे प्रयत्न करण्यात आले. या सर्व प्रक्रियेस ’विपणन’ असे म्हणतात. विपणन हे एक प्रगत असे शास्त्र आहे. पूर्वीच्या काळी विपणन हे वाणिज्य व व्यापाराचा एक भाग समजला जात असे. पण आधुनिक काळात एक महत्त्वपुर्ण शास्त्र म्हणुन ओळखले जात आहे.

१.१ विपणन
इंग्रजीतील Marketing या शब्दासाठी मराठीत विपणन हा शब्द वापरला जातो. लॅटीन शब्द Mercatus पासुन फ्रेंचमध्ये Markeit, इटालियनमध्ये Merecato आणि जर्मनीत Market असे शब्द तयार झालेले दिसून येतात. वि हा धातू पणन या शब्दात जोडुन वि + पणन असा शब्द बनला आहे. पणन म्हणजे मालाची विक्री करणे होय. थोडक्यात, मालाची विक्री करण्याचे शास्त्र म्हणजे विपणन असा अर्थ होऊ शकतो
विपणन ही व्यापक संज्ञा आहे. बाजार (Market) आणि विपणन (Marketing) यातही फरक आहे.
व्याख्या
’विपणन’ या शब्दाच्या व्याख्या तज्ज्ञांनी विविध प्रकारे केलेल्या आहेत. त्यापैकी काही महत्त्वाच्या व्याख्या पुढीलप्रमाणे
• "विपणन ही ग्राहकाच्या मागणीचा पाठपुरावा करणारी प्रक्रिया आहे. बाजारात वस्तुंना व सेवांना मागणी असते. तिच्या आधारे स्वःसाठी नफा आणि उपभोक्त्यांसाठी गरजांची पुर्तता विपणनातून साध्य होते."
- इ.एफ.एल.ब्रेच
• "विपणन ही प्रक्रिया आहे की ज्यामधून समाजाला अधिक उच्च प्रकाराचे राहणीमान उपलब्ध केले जाते."
-पॉल मसुर (Masur)
• "विपणन प्रक्रिया ही प्रत्येक व्यवसायाची सुरुवात आणि शेवट असतो."
-फिलिप कोटलर
• "वस्तू आणि सेवा यांचे एका व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा संस्थेकडे दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा संस्थेकडे होणारे हस्तांतर, वस्तुंच्या मालकीचे हस्तांतर शक्य करणाऱ्या सर्व कृती म्हणजे विपणन होय."
अमेरिकन मार्केटींग असोसिएशन
मार्केटींग या संकल्पनेतून विविध कार्ये, एकत्रित स्वरुपाची सुचित केली जातात, ज्या कार्यांची दिशा मागणीला प्रोत्साहन देण्याची असते आणि निर्माण झालेली मागणी पुर्तता करण्याचा प्रयत्नही त्या प्रक्रियेत असतो.
१.१.१ विपणनाचे स्वरुप किंवा उत्क्रांती
विपणन हे प्रकाराचे सामाजिक आणि आर्थिक अशा स्वरुपाचे संधोनाचे क्षेत्र आहे. औद्योगिक क्षेत्रात, वाणिज्य क्षेत्रात जसेजसे वस्तू वितरणाच्या क्षेत्रातही हळूहळू बदल होत गेले आहेत, अशा बदलांना उत्क्रांती असे म्हणतात. उपभोक्ता आणि उत्पादक यांतील अंतर जसेजसे वाढत गेले, त्यांच्यातील प्रत्यक्ष संबंध संपून, परस्परसंबंध जसे दुरावले, तसतसे प्रमाणात विपणन प्रगत होत गेले. विपणनातील विविध प्रक्रियांची संख्या वाढत-वाढत गेली. भारतात विपणन क्षेत्रात जी उत्क्रांती होत गेली त्याच्या प्रमुख पायऱ्या (Stages) पुढीलप्रमाणे आहेत.
(१) स्वावलंबी अवस्था (Self Sufficient Stages): मानवी इतिहासात पुष्कळ वर्षे मानवाचे जीवन स्वावलंबी स्वरुपाचे होते. उत्पादक आणि उपभोक्ता या दोन्ही भूमिका एकाच व्यक्तीकडून बजावल्या जात असत. प्रत्येक कुटुंब आपापल्याला गरजा भागविण्याइतके स्वावलंबी होते. आपल्या गरजा भागतील एवढेच उत्पादन असल्याने विनिमयाचा प्रश्न नव्हता. विपणन ही संकल्पना त्या काळात माणसांच्या मनातही आली नाही. उत्पादन माफक प्रमाणावर असल्याने विक्री प्रयत्नांचा प्रश्नच अस्तित्वात नव्हता. यामुळे या अवस्थेला ’स्वावलंबी अवस्था’ असे संबोधले जाते.
(२) विनिमयाभिमुख अवस्था (Exchange oriented Stages): वाणिज्याच्या उत्क्रांती अवस्थेत ग्रामीण अर्थव्यवस्था हा दुसरा टप्पा होता. या अवस्थेत मानवी गरजा वाढत गेल्या, पण सर्व गरजा स्वबळावर भागविण्यासाची क्षमता कोणत्याही कुटुंबाची नव्हती. अशा परिस्थितीत दुसऱ्या कुटुंबाशी संपर्क साधण्याला चालना मिळाली आणि अल्प प्रमाणात एका वस्तुच्या बदल्यात दुसरी वस्तू असे व्यवहार सुरु झाले. मात्र अशा व्यव्हाराची संख्या स्थानिक पातळीवरच मर्यादित राहिली. कौटुंबिक पातळीवरील वस्तुंची आपापसातील अदलाबदल किंवा देवाण - घेवाण यामध्ये व्यक्ती परस्परांच्या प्रत्यक्ष संपर्कात येत असत आणि विनिमय माध्यमाशिवाय व्यवहार होत असत. विपणनाच्या उत्क्रांतीतील ही पहिली अवस्था समजता येईल.
(३) उत्पादनाभिमुख अवस्था (Product Oriented Stage): या अवस्थेमध्ये औद्योगिक क्रांतीचा प्रभाव आणि विविध क्षेत्रांतील शोधांचा प्रभाव उत्पादनावर पडलेला दिसतो. या काळात उत्पादकांनी आपल्या हितसंबंधांना प्राधान्य देण्यास सुरूवात केली आणि ग्राहकांवर आपला प्रभाव राखण्याचा प्रयत्न केला. यातून विपणन उत्पादनाभिमुखी बनले. ग्राहकांचा विचार, त्यांचे समाधान या गोष्टी कमी महत्त्वाच्या समजल्या गेल्या. वस्तुच्या सुधारणेकडे फक्त लक्ष दिले गेले आणि विक्रयवृध्दीसाठी खास वेगळ्या स्वरूपाचे असे प्रयत्न उत्पदकांनी केले नाहीत. थोडक्यात, उत्पादक जे बाजारपेठेत आणेल ते स्वीकारण्याची ग्राहकाची तयारी असे, पण ’ग्राहकांच्या कल्याणासाठी उत्पादन’ हा विचार त्या काळात दुर्लक्षित होता.
(४) विक्रीभिमुखी विपणन अवस्था (Sales Oriented Stage): केवळ उत्पादन नव्हे तर विक्रीकडेसुद्धा लक्ष पुरविण्याची गरज कालांतराने निर्माण झाली. याचे कारण बाजारपेठा आणि स्थानिक न राहता टप्प्याटप्प्याने त्यांचा शहरी बाजारपेठा असा होत गेला. वाहतुकीची नवनवीन साधने अस्तित्वात आली. विविध बाजारपेठांत विखुरलेल्या ग्राहकांशी नियमित संपर्क राखणे उत्पादकांना अवघड ठरू लागले आणि त्यामुळे विक्रीची पर्यायी व्यवस्था आवश्यक बनली. केवळ स्थानिक बाजारपेठांवर अवलंबून राहणे उत्पादकांना अयोग्य वाटू लागले आणि विक्रीचे प्रयत्न वाढविण्याची गरज स्पष्ट झाली. त्याचाच परिणाम म्हणजे मध्यस्थांची मदत घेणे गरजेचे वाटू लागले. उत्पादन पूर्वीप्रमाणे उत्पादकाभिमुख न राहता ते विक्रीभिमुख (Sales Oriented Stage) बनले. बाजारपेठेत काय विकले जाईल? किंवा कोणत्या वस्तूंना मागणी येऊ शकेल? याचे प्रमुख अनुमान करण्याची पध्दती सुरू झाली आणि उपभोक्त्याचे महत्त्व प्रथमच उत्पादकांच्या लक्षात आले. ज्यामुळे विक्रीला चालना मिळेल अशा प्रकारचे प्रयत्न उत्पादकांना आवश्यक वाटू लागले.
(५) ग्राहकाभिमुखी अवस्था (Consumer Oriented Stage): या अवस्थेला विपणनाच्या उत्क्रांतीतील शेवटचा टप्पा समजला जातो. विशेषत्वे १९ व्या आणि २० व्या शतकाच्या स्पर्धेचे स्वरूप आणि स्पर्धेचे स्वरूप आणि स्पर्धेचे प्रमाण खूपच बदललेले आहे. आजकाल बाजारपेठेत मागणीचे प्रमाण खूपच विस्तारलेले आहे. त्याचप्रमाणे एकाच वस्तूची निर्मिती करणारे अनेक उत्पादक आहेत. अशा परिस्थितीत गेल्या एक-दोन शतकांच्या कालावधीत विपणनातील धोके आणि अनिश्चितता वाढत चाललेली आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्था गतिमान बनलेल्या आहेत. अशा बदलत्या काळाच्या पार्श्वभूमीवर कोणताही उद्योजक फक्त स्वत:चा स्वार्थ विचारात घेऊ शकत नाही. फक्त नफा आणि विक्री याच दोन गोष्टींचा विचार करणे आत्मघातकी स्वरूपाचे ठरते. ग्राहकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणे, त्यांना कायम स्वरूपात ’ग्राहक’ म्हणून टिकवून धरणे यासठी संकुचित दृष्टिकोन बाजूला ठेवावा लागतो. निदान बाह्यदर्शनी स्वरूपात आपण ग्राहकाच्या हितकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करतो हे प्रत्येक स्पर्धक उद्योजकाला दाखवावे लागते आणि त्यातूनच ग्राहकाभिमुखी विपणन हा दृष्टिकोन सर्व संमत ठरलेला आहे.
(६) समाजाभिमुखी विपणन अवस्था (Social Oriented Stage): विपणनात ग्राहक संतोष या दृष्टिकोनावर भर दिला जाऊ लागला. ग्राहकांच्या गरजा व आवश्यकतांनुसार उत्पादनात बदल केले जाऊ लागले. अधिकाधिक वस्तू व सेवांचा उपभोग करणे म्हणजे समाजात समृध्दीचे लक्षण मानले जाऊ लागले. असे असले तरी, समाजातील एक वर्ग हळूहळू जागृत होत असून पर्यावरण प्रदूषण व चंगळवाद आणि आर्थिक शोषण याबद्दलची मते तो मांडू लागला आहे. तसेच अनावश्यक खर्च टाळणे, ऊर्जेचा अपव्यय टाळा, इंधन बचत करा व प्रदूषण टाळा या विषयांवर सकारात्मक प्रचारही होऊ लागला.

१.१.२ विपणन या संज्ञेत समाविष्ट होणारे घटक
1) विपणन हे व्यावसायिक कार्य आहे.
2) विपणनात विनिमय प्रक्रिया अंतर्भूत आहे.
3) विपणन हे मानवी गरजा व आवश्यकतांच्या समाधानासाठी आहे.
4) उत्पादनानंतर उत्पादित वस्तू वा सेवांचा उपभोक्त्यापर्यंत होणारा प्रवास विपणनात आहे.
5) विपणन ही आर्थिक प्रक्रिया आहे.
6) विपणनात वस्तूच्या मालकी हक्कांचे हस्तांतरण अंतर्भूत आहे.
7) विपणनामुळे समाजाचे जीवनमान उचांवते.
8) विपणन ही एक व्यावसायिक प्रक्रिया आहे.
9) विपणनात वस्तू किंवा सेवांच्या भौतिक वितरणाच्या व्यवस्था अंतर्भूत आहे.

१.१.३ विपणनाची व्याप्ती
तीव्र स्पर्धेचे वातावरण आणि व्यापाराचे उदारीकरण यामधून बाजारपेठांचे आकारमान सतत वाढत गेलेले दिसते. स्थानिक बाजारपेठ, प्रादेशिक बाजारपेठ, राष्ट्रीय बाजारपेठ आणि जागतिक बाजारपेठ असा विस्तार होता होता संपूर्ण जगच आता एक बाजारपेठ बनलेले आहे. या बाजारपेठेत देशोदेशीचे असंख्य उत्पादक आणि विक्रेते परस्परांशी स्पर्धा करताना दिसतात. प्रत्येक देश एकूण जागतिक व्यापारात आपला वाटा कसा वाढेल याचा विचार करताना दिसतो. कारण व्यापारवृध्दी आणि आर्थिक विकास या गोष्टी परस्परांवर अवलंबून आहेत.
बाजारपेठांचा जसा भौगोलिक विस्तार होत गेला आणि त्यातूनसार उत्पादक आणि उपभोक्ते यांच्यातील मध्यस्थांची साखळी विस्तारत गेली आणि त्यातूनच विपणन या संकल्पनेची व्याप्तीही वाढत गेलेली दिसते. औद्योगिक आणि वाणिज्याचे उत्क्रांती तसेच उत्पादन तत्रांत झालेले बदल, आनुषांगिक साधनांचा विकास (उदा. बॅंक व्यवसाय, वाहतूक व्यवसाय, साठवण, व्यापारी अभिकर्ते इत्यादी) या सर्वांचा परिणाम म्हणून विविध विपणन कार्यासंबधी अधिक सुक्ष्म पातळीवरून(Micro Trend) विचार करण्यास सुरूवात झाली. विपणी संशोधन (Market Reasearch) आणि विपणन संशोधन (Marketing Reasearch) अशा दोन वेगवेगळ्या शाखांत संशोधन कार्यावर अधिक भर देण्यास सुरूवात झाली. विपणनविषयक कार्ये विविध व्यक्ती आणि संस्था यातून विभागली गेली आणि त्याचाही परिणाम विशेषीकरणामध्ये झाला.
आजकाल विपणनविषयक कार्ये उत्पादक स्वतः करीत नाहीत. कारण स्पर्धात्मक वातावरणात वस्तूच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागते. विपणन कार्यांसाठी उत्पादक स्वतंत्र वेळ देऊ शकत नाहीत. त्यांच्याकडून मध्यस्थ स्वरूपात कामे करणाऱ्या संस्थांची मदत घेतली जाते. उदा., जाहिरात आणि प्रसिध्दी, वाहतूक आणि साठ्वण, विमा आणि अर्थसाहाय्य अशा वेगवेगळ्या संस्थांशी संपर्क ठेवला जातो. त्यांचा अनुभव व विषयातील सखोल ज्ञान यांचा उत्पादक स्वतःच्या संस्थेसाठी उपयोग करून घेतो. असा उपयोग करून घेताना तो विविध सेवांची किमंतही मोजतो.
विपणन या संकल्पनेची व्याप्ती गतिमान अर्थव्यवस्थेमुळे सातत्याने गेल्या पाच ते दहा दशकांत वाढतच गेलेली आहे. सद्दःपरिस्थितित आपल्याला, उत्पादकांना उपयुक्त ठरणाऱ्या संस्थांची साखळीच निर्माण झालेली दिसते. सहजीवन किंवा सहअस्तित्व (Expert Person) ही संकल्पना समाजात अधिक रूढ झालेली दिसते. सर्वच व्यावसायिक परस्परांची मदत घेऊनच आपली प्रगती करतात. स्पर्धेऎवजी सहकार्य हा दृष्टीकोन आताजवळपास सर्वमान्य आझे. त्यातूनच विपणन या संकल्पनेची व्याप्ती वाढत गेलेली आहे. या व्याप्तीला विशिष्ट आशी काळाची मर्यादा नाही. व्याप्ती सतत वाढत जाणारी आहे.


१.१.४ विपणनाचे महत्त्व
विपणन ही एक ’कार्याचा समूह’ (Group of Activities) दर्शविणारी संकल्पना आहे. उत्पादक आणि वितरक वस्तूंच्या प्रभावीपणे विक्रीसाठी काही कार्ये संयुक्तपणे आणि काही कार्ये स्वंत्रतपणे पार पाडत असतात, मात्र असे असले तरी अंतिम ध्येय दोघांच्याही बाबतीत एकच असते. ’अधिकाधिक विक्री’ आणि ’ ’अधिकाधिक नफा’ याबाबत दोघेही आपापल्या परीने स्वप्नपुर्ती करीत असतात. व्यवसातून नफा मिळवितात. यामधूनच विपणनाला (Marketing) महत्त्व प्राप्त होते. विपणनाचे महत्त्व प्रकारे स्पष्ट करता येईल.
(१) रोजगारसंधीत वाढ : काही जाणकार तज्ज्ञांच्या मते विपणन कार्ये (बांधणी, साठवण, वाहतूक, जाहिरात प्रसिध्दी इ.) अनेक औद्योगिक आणि व्यावसायिक संस्थातून रोजगार निर्माण करतात. कुशल त्याचप्रमाणे निम्नकुशल तसेच अकुशल कर्मचार्यांसाठी रोजगार उपलब्ध होतो. एका अंदाजाप्रमाणे सुमारे ४० कर्मचारी विविध विपणन प्रक्रियांशी संबधित असतात. जर्मनी, जपान व संयुक्त संस्थाने या देशांतून जाहिरात व प्रसिध्दी संस्था, वाहतूक विमा व्यवसाय, साठवण, घाउक आणि किरकोळ व्यापार करणारऱ्या संस्था यांमधून फार मोठा रोजगार उपलब्ध होतो. विक्रय कला व जाहिरात या क्षेत्रात तरुण, होतकरु व्यक्तींना आपले सुप्त गुण प्रकट करण्याची संधी मिळते. विपणन कार्ये हजारोंच्या उपजिविकेच्या साधने बनतात.
(२) प्रमाणित आणि दर्जेदार वस्तूंचे वितरण : विपणन प्रक्रियेत प्रमाणीकरण आणि प्रतवारी ही कार्ये समाविष्ट होतात. प्रमाणीकरणाचे कार्ये औद्योगिक वस्तूंच्या बाबतीत तर प्रतवारीचे कार्य शेती उत्पादनांच्या बाबतीत केले जाते. हलक्या प्रतीच्या वस्तू बाजारात येण्यापासून प्रतवारी आणि प्रमाणीकरण कार्याने प्रतिबंध केला जातो. आजकाल पुष्कळशा उत्पादनांवर ISO, I.S.I Maark आनी 'AGMAARK' दर्शविलेला असतो. अशी चिन्हे वस्तूंचा दर्जा स्पष्ट करतात. दर्जेदार वस्तूच बाजारात आल्याने त्यांना स्वतंत्र जाहिरात करावी लागत नाही. अशी उत्पादने आपली ओळख आपोआप पटवितात. दर्जेदार गुणवत्ता धारण करणारी उत्पादने विकल्याने विक्रेत्याची प्रतिष्ठा तर वाढतेच पण नागरिकांची राहणीमान पातळी उंचावण्यास साहाय्य मिळते.
(३) राष्ट्रीय उत्पनात भर : विपणन यंत्रणा जर प्रभावी असेल तर विक्रीला योग्य अशी वातावरणनिर्मिती आपोआप होते. वस्तू आणि सेवांच्या मागणीत सतत वाढ होते. वस्तू आणि सेवा यांच्या उत्पादनात वाढ करावी लागते या सर्वांचा परिणाम म्हणजे राष्ट्रीय उत्पादनात वाढ होते. एकूण अर्थव्यवस्थेचे (आर्थिक) हितसंबंध पाहता राष्ट्रीय उत्पन्नात भर पडण्याला विशेष महत्त्व असते.
(४) व्यापारचक्रापासून (मंदीपासून) संरक्षण : व्यापारचक्र सतत उलट -सुलट गतीने, दिशेने बाजारपेठेत कार्यरत असते. व्यापारचक्राच्या गतीचे - दिशेचे परिणाम सर्व व्यावसायिकांना कमी - अधिक प्रमाणावर जाणवतात. याचे कारण पुष्कळसे व्यवसाय परस्परांवर अवलंबित असतात. विपणन कर्ये मंदीच्या प्रवृत्तीस रोखून धरतात. विपणन कार्यामूळे (जाहिरात, प्रसिध्दी. विक्रय कला इत्यादी) समाजात एक प्रकाराची जाणीव - जागृती निर्माण होते. समाजाला आपल्या गरजांची सतत जाणीव करून दिली जाते. यातून मागणी वाढते. उत्पादन वाढते आणि व्यावसायिक व उत्पादनसंस्थांची घसरण (Depression or Downword Trend) रोखून धरली जाते. मंदीच्या काळात पुष्कळसे छोटे उद्योग बंद पडतात, कर्मचार्यांवर ’नोकरकपाती’ ची आपत्ती येते. मोठ्या औद्योगिक संस्थांकडून पुरेशी मागणी मिळत नाही. विपणन कार्ये म्हणजे ’सामूहिक कृती’ व्यापारचक्रापासून संरक्षण पुरविते.
(५) वितरण खर्चात बचत : विपणन कार्यामुळे वितरण खर्चात बचत होते. उदा., वाहतूककार्य यासाठी जलद, वेगवान आणि सुरक्षित वाहतूक साधने वापरली जातात. रेल्वे-वाहतूक, मालट्रक यांतून जास्तीत जास्त मालाची वाहतूक केली जाते. जाहिरात आणि प्रसिध्दी या कार्यामुळेसुध्दा वितरण खर्चात बचत होते. प्रत्येक वस्तूमागचा सरासरी वितरण खर्च कमी होतो. सुरुवातीस जरी वितरणखर्च जास्त वाटला तरी कालांतराने मागणी जसजशी वाढत जाते तसातसा वितरण खर्च कमी होतो. मात्र हा विपणन कार्याचा दीर्घकाळातच मिळणारा फायदा आहे.

व्यावसायिक संस्था, समाज, ग्राहक व उत्पादक यांच्या दृष्टीने उत्पादनाचे महत्त्व पुढीलप्रमाणे -
(१) व्यवसायाचे नियोजन आणि निर्णय घेण्याच्या कामी मदत मिळते. विशषतत्वे उत्पादन व सग्रहण यांविषयी नेमकी कोणती धोरणे ठारविता येतात. विक्रीविषयक अनुमान (Sales Forecast) करता येते. जेवढ्या प्रमाणात वस्तू विकल्या जाण्याची शक्यता आहे तेवढ्याच प्रमाणात उत्पादन करण्याचा निर्णय संस्था घेते. खरेदी, वित्तपुरवठा व गुंतवणूक यासंबंधीचे निर्णयसुध्दा विपणन कार्याशी दुरान्वये संबंधित असतात.
(२) नफ्याचे किंवा लाभाचे प्रमाण वाढविण्याकरितासुध्दा विपणन कार्याचा उपयोग होतो. विक्री खर्चात (Selling Cost) बचत होते. जाहिरात व प्रसिध्दीने मागणीत वाढ होते त्यामुळे संस्थेचा लाभ होतो.
(३) विपणन कार्ये उत्पादनसंस्थेचा बाह्य जगाशी संपर्क दुवा ठरतात. जाहिरात संस्था, वाहतूक संस्था, संग्रहण सेवा देणार्या संस्था, बांधणी साहित्य पुरविणार्या संस्था यांच्याशी उत्पादकसंस्थेचा संबंध येतो. घाउक व्यापारी, किरकोळ व्यापारी व निर्यात संस्थेशी घनिष्ठ स्वरूपाचे जवळून संबंध येतात. मध्यस्त यंत्रणेचा वापर करण्याचे वर्तन, स्पर्धकांची उत्पादने व स्पर्धकांची किंमत धोरणे यांविषयी माहिती कळते.
समाजाच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व
(१) राहणीमान उंचावते : विपणनामुळे उत्पादनांना मागणी निर्माण होते आणि लोकांचे राहणीमान उंचावते. नवीन तंत्रज्ञानाच्या वस्तू व सेवा ग्राहकांना उपलबध्द झाल्याने एकूण समाजाच्या जीवनशैलीचा दर्जाही बदलतो. पॉल मझूर यांच्या मते, "विपणन म्हणजे समाजाच्या जीवनमानाची निर्मिती होय."
(२) विपणनामुळे रोजगारनिर्मिती होते : विपणन संशोधन, घाउक व किरकोळ व्यापार, वाहतूक, दळणवळण, साठवण, संग्रहण व प्रसिध्दी वैगेरे असंख्य कामांमध्ये विपणनामुळे रोजगार प्राप्त होतो.
(३) वितरण खर्चात कपात : अधिकाधिक ग्राहकांपर्यंत वस्तू किंवा सेवांचा पुरवठा करताना वितरण खर्च कमी करणे हे विपणनाचे ध्येय असते. वितरण खर्च कमी झाल्याने उत्पादनाच्या विक्री किंमतीतही घट करता येते व समाजाची उपभोग पातळी वाढविता येते. वितरण खर्चात घट झाल्यामुळे वस्तू स्वस्त किंमतीला विकता येतात.त्यामुळे समाजातील दुर्बल घटकालाही या वस्तू खरेदीचा फायदा घेता येतो किंवा वस्तूच्या वितरण खर्चात होउनही विक्री किंमत कमी केली नाही तर व्यवसायसंस्थेचा नफा वाढतो आणि हा वाढलेला नफा कामगार कर्मचार्यांना पगारात वाढ व भागधारकांना अधिक लाभांश याद्वारे पुन्हा समाजाला देता येतो.
(४) राष्ट्रीय उत्पनात वाढ : विपणनामुळे अर्थव्यवस्थेत चैतन्य निर्माण होते. समाजाचे राहणीमान आणि त्यामुळे कार्यक्षमता उंचावते व त्याचा फायदा राष्ट्रीय उत्पादनवाढीत होतो.

ग्राहकांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व
(१) ग्राहकांना शिक्षण मिळते : विपणन प्रक्रिया जेवढी समृध्द, प्रगत व विकसनशील असते तेवढे ग्राहक शिक्षण होण्याचे प्रमाण अधिक असते. प्रगत विपणन तंत्रामुळे समाजाचे एक प्रकारे शिक्षण होत असते. निरोगी विपणन स्पर्धेमुळे ग्राहकाचे ज्ञान अधिक उंचावते. नव्या तंत्रप्रणालीची माहिती त्याल मिळते.
(२) किंमतीचा फायदा : विपणन प्रगत नसते तर दूरवर वस्तू न पोहोचता त्या उपलब्ध असतील तेथून असेल त्या किमतीस ग्राहकांना खरेदी कराव्या लागल्या असत्या; परंतु प्रगत विपणनामुळे अगदी जवळच्या अंतरावर व योग्य किमतीस वस्तू उपलब्ध होतात.
(३) आवडीप्रमाणे वस्तूंचा उपलब्धता : विपणनामुळे विविध प्रकारच्या, नव्या फॅशनच्या व नवीन रंग-रूप-गंध-आकारांच्या वस्तू बाजारपेठेत उपलब्ध होतात. त्यामुळे ग्राहकांना आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करता येतात.
(४) वस्तूसेवांची उपलब्धता : विपणनामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार हव्या असणार्या वस्तू वा सेवा सहज उपलब्ध होउ शकतात. विपणनामुळे विविध देशांत तयार होणाऱ्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचतात.
(५) ग्राहकांची फसवणूक होत नाही : प्रगत विपणनामुळे अनेक वस्तू बाजारपेठेत उपलब्ध होतात. शिवाय वस्तूंच्या किंमतीत खूप मोठी तफावत राहत नाही. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत नाही.

उत्पादकांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व
(१) नफा वाढतो : प्रगत विपणनामूळॆ व्यवसायसंस्थेचा वस्तू वा सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचतात. विपणन व्यवस्थेमुळे व्यवसायसंस्था महत्तम नफ्याचे आपले उदिष्ट गाठू शकते. एका बाजूने विपणनामुळे विक्री किंमतीत घट करता येते तर दुसर्या बाजूने जाहिरात व विक्रयवृध्दीच्या साहाय्याने विक्रीचे प्रमाण वाढवून एकूण नफ्यात वाढ साधता येते.
(२) संदेशवहनाचे कार्य : विपणनामुळे ग्राहकांना नव्या उत्पादनांची, तंत्रज्ञानाची महिती मिळते. उत्पादकांला ग्राहकांच्या बदलत्या आवडी - निवडीची माहिती मिळते. मध्यस्थांना ग्राहक व उत्पादक दोन्ही बाजूंकडून माहिती मिळते.
(३) संदेशवहनाचे कार्य : विपणनामुळे ग्राहकांची संख्या वाढते. मध्यस्थांशी व्यापार वाढतो. त्यामुळे व्यवसायसंस्थेची संघटनात्मक बांधणी भक्कम होते. नफ्यात वाढ होते, उत्पादन वाढते, कामगारांना पगारवाढ करता येते तर भागधारकांना चांगला लाभांश देता येतो त्यामुळे व्यवसायास स्थैर्य प्राप्त होते.
(४) नियोजन व निर्णय प्रक्रियेस साहाय्य : व्यवसायसंस्थेच्या संदर्भातील नियोजन व निर्णय प्रक्रियेस विपणन साहाय्य्कारी ठरते. सध्याच्या काळात विक्रीच्या अंदाजावरून किती उत्पादन करायचे हे ठरविता येते.

विपणनाचे फायदे
1) विपणनामुळे मूळ उत्पादक व अंतिम उप्भोक्ता यांची साखळी जोडली जाते. त्यामुळे विनिमय प्रक्रिया सुलभ होउन तिला चालना मिळते.
2) विपणनामुळे संग्रहण कार्य होते. संग्रहणामुळे हंगामी उत्पादन असणार्या वस्तूसुध्दा वर्षभर ग्राहकांना उपलब्ध होउ शकतात.
3) विपणनामुळे अर्थव्यवस्थेत चैतन्य प्राप्त होते. अर्थचक्रास गतिमान ठेवण्याचे कार्य विपणनामुळे सुरळीत होते.
4) उत्पादनामुळे रूप स्वरूपात (Form Utility) उपयुक्तता मूल्य निर्माण होते. विपणनामुळे स्थळ, काळ व मालकी किंवा ताबा या संदर्भातील उपयुक्तता मूल्याची निर्मिती होते.
5) विपणनामुळे वस्तू वा सेवांचे भौतिक वितरण व मालकी हस्तांतरण सुलभ होते.
6) विपणनामुळेच वस्तूच्या प्रमाणीकरणास प्रोत्साहन मिळते. रंग, वजन, दर्जा, चव व आकार इत्यादी विविध घटकांच्या आधारावर प्रमाणीकरण होते. त्यामुळे वस्तूची निवड करणे ग्राहकांना सुलभ होते.
7) विपणनामुळे उद्योजकता विकासास चालना मिळते.
8) विपणनामुळे माहितीचे आदान - प्रदान सुलभ होते. बाजारपेठेविषयक माहितीच्या गतीमुळे व्यापारी - मध्यस्थ, ग्राहक व उत्पादन अशा सर्वांना फायदा होतो.
9) विपणनामुळे वाहतूक, जाहिरात, मध्यस्थ, संग्रहण, बाजारपेठ, संशोधन व दळणवळन अशा विविध क्षेत्रांत नवीन रोजगार्निर्मिती होत राहते.
10) विपणनामुळे मागणीची वृत्ती प्रबळ होते. त्यामुळे विकसनशील देशांतील आर्थिक व सामाजिक अभिसरणास वेग येतो.

१.१.५ विपणनाच्या मर्यादा
व्यावसायिक संस्थेचे किंवा उत्पादकसंस्थेचे स्वरूप कोणत्याही प्रकारचे असो विपणन कार्य अटळ स्वरूपाचे असते. या कार्याच्या अभावी कोणत्याही वस्तू किंवा सेवा बाजारपेठेत परिणामकारकपणे ग्राहकांपर्यंत नेत येत नाहित आणि वस्तू विक्रीचे उदिष्ट साध्य करता येत नाही. प्रत्येक उत्पादकाला (शेतीक्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्र यातील निर्माता व्यक्ती किंवा संस्था) वर्गीकरण, प्रमाणीकरण, प्रतवारी, संवेष्टन, निश्चित किंमत व जाहिरात ही कार्ये करावीच लागतात, पण अशी सर्व कार्ये केवळ उत्पादक एकटाच करू शकत नाही. असे केले तर त्याचे उत्पादन कार्यावरचे लक्ष विकेंद्रीत होइल. उत्पादक याकरिता विविध व्यक्तींची किंवा संस्थांची मदत घेतो. तरीसुध्दा विपणन कार्य सुरळीतपणे पार पडेलच असे सांगता येत नाही. विपणन कार्याच्या मर्यादा पुढीलप्रमाणे जाणवतात.
(१) आर्थिक स्वरूपाची मर्यादा : विविध विपणन करण्याकरिता उत्पादकांचा पैसा खर्च करावा लागतो. बांधणी कार्य, साठवण कार्य, वाहतूक, जाहिरात आणि विविध आणि अभिकर्त्यांच्या सेवा या सर्वांचा मिळून एकूण होणारा खर्च मोठ्या प्रमाणात असतो. छोटे उद्योजक आणि कारखानदार यासाठी स्वतंत्र आर्थिक व्यवस्था करू शकत नाहित. त्यांना खेळत्या भांडवलाची कमतरता भासते. जर या कार्यांसाठी त्यांनी पैसा खर्च केला तर उत्पादन कार्यासाठी पुरेसे भांडवल शिल्लक राहत नाही.
(२) व्यावसियकांचे परावलंबित्व : विपणन कार्याच्या बाबतीत दुसरी मर्यादा म्हणजे उत्पादकांचे किंवा व्यावसायिकांचे पराविलंबित्व वाढते. विविध संस्था आणि मध्यस्थ यांची मनधरणी करावी लागते. प्रसंगी जास्त किंमतही मोजावी लागते. उदाहरणार्थ, वाहतूक संस्थेच्या सेवा जर रेल्वे किंवा मोटार वाहतूक क्षेत्रात संपाचे किंवा बंदचे वातावरण असेल तर वाहतूक व्यवस्थेअभावी बाजारात वस्तू वितरित करता येत नाहित.
(३) संस्थात्मक प्रगतीचा अभाव : भारतासरख्या देशात विशषतत्वे ग्रामीण भागात मध्यस्थ संस्थांचा विकास अल्प प्रमाणात झालेला दिसतो. जाहिरात संस्था, साठवण व्यवस्था, मध्यस्थ सेवा (Agency Service) संस्था, शहरांमध्ये जितक्या विकसित अवस्थेत आहेत तेवढा विकास ग्रामीण भागात किंवा शहरांच्या उपनगरात झालेल्या नाही. तसेच या विविध संस्था आपल्या सेवा खर्चात (Service Charges0 सतत वाढ करतात त्यामुळे उत्पादकाचा खर्च वाढतो. हा खर्च वस्तूंच्या किंमतीतून पुष्कळदा भरून काढणे शक्य नसते. कारण वस्तूंच्या किंमती वाढविल्या तर वस्तूंची स्पर्धा क्षमता कमी होते.
(४) बदलते तंत्रज्ञान : व्यवसायाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये सातत्याने सुधारणा होत आहेत. नवीन ज्ञानाची आणि पध्दतीची भर पडते आहे. गतिमान अशा स्वरूपात बाह्य पर्यावरण बदलत असताना प्रत्येक संयोजक या बदलांशी लगेच मिळवून घेउ शकत नाही. तंत्रज्ञान आत्मसात करण्याकरिता प्रशिक्षणाची गरज असते, पण प्रत्येक संयोजक त्यासाठी स्वतंत्र वेळ देउ शकत नाही. यामुळे पुष्कळसे उद्योजक पुर्णतः मध्यस्थ संस्थांवर अवलंबून राहतात ज्याचा गैरफायदा घेतला जाणे शक्य असते.
(५) विकास आणि संशोधन : विपणन कार्य हे चिरस्थायी स्वरूपाचे नाही. बदलत्या काळाप्रमाणे विविध क्षेत्रांत नवीन साधनांची आणि तंत्राची भर पडत आहे. स्पर्धात्मक वातावरणात आपला व्यवसाय टिकवून धरण्याकरिता आधूनिकता आणि यांत्रिकीकरण यावर भर द्यावा लागतो. व्यावसायिकाला व उद्योजकाला बदलत्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवावे लागते. सातत्याने महिती गोळा करावी लागते. स्पर्धकांच्या वस्तूंचा विश्लेषणात्मक अभ्यास करावा लागतो. विकास आणि संशोधन विभाग स्वतंत्रपणे स्थापन करावे लागतात. व्यवसायातील गुंतवणूकीचे प्रमाण वाढवावे लागते. जे सर्व उद्योजकांना सहजपणे शक्य होत नाही.

संकलन- तुषार ओव्हाळ,बी.एम.एम.तृतीय वर्ष. एस. के. सोमैय्या महाविद्यालय,विद्याविहार.

No comments:

Post a Comment