Tuesday, March 30, 2010

(Media effects) मीडिया इफेक्ट्स - माध्यम परिणाम

(Media effects) मीडिया इफेक्ट्स - माध्यम परिणाम : माध्यमांचा परिणाम वाचक/प्रेक्षकांवर होतो काययाबाबत मतभिन्नता आहे. एका अर्थाने माध्यम परिणाम हे स्वयंसिद्धच आहे. हवामानवृत्ताचा आपल्यावागण्यावर परिणाम होतोच. गाड्या किंवा विमाने उशीरा धावताहेत, परिसंवाद कुठे आहेत, कोण काय बोलले, कसेवागले या सगळ्या बातम्यांमुळे आपल्यावर परिणाम होतो. चित्रपटांचे नट, नटी यांच्या वागण्याचा, कपड्यांचापरिणाम आपल्या वागण्यावर होतो. हा सगळा आपला नेहमीचा अनुभाव आहे. मात्र माध्यमांचा परिणाम कितीआणि कसा होतो याबाबत एकमत नाही. काही अभ्यासकांनुसार माध्यमांचा अगदी प्राथमिक स्वरूपचा परिणामव्यक्ती किंवा समाजावर होतो.
माध्यमांचा, विशेषत: टीव्ही या माध्यमाचा परिणाम, हा नकारात्मकच होतो असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. हिंसा, मैथुन, दंगली, जातीय, वांशिक, धार्मिक विषमता पसरवणे, दंगलीचे लोण पसरवणे, भीती पसरवणेइत्यादींच्या बाबतीत अनेकदा माध्यमांना दोषी धरले जाते. समाजातील वाईट प्रवृत्ती पसरवण्यात माध्यमांचाहातभार लागतो हा समज गेली अनेक दशके मान्य झाला आहे.
माध्यम परिणाम ही संकल्पना माध्यम अभ्यासातील 'हायपोडर्मिक मॉडल' सिद्धांत मांडते. या सिद्धांतानुसारएखाद्या सुईने जसे औषध थेट आपल्या नसात पोहोचवले जाते त्याप्रमाणे माध्यमे माध्यम संदेश आपल्याडोक्यात पोहोचवतात. हा सिद्धांत असे गृहित धरतो की वाचक/प्रेक्षक हे निष्प्रभ असतात. प्रत्यक्षात मात्रवाचक/प्रेक्षक हे निमूटपणे संदेश ग्रहण करत नसतात तर संदेशांना स्वत:चे अर्थ लावतात आणि आपआपल्यामताप्रमाणे, गरजेप्रमाणे, कुवतीप्रमाणे त्यावर निर्णय घेतात. या आक्षेपामुळे 'हायपोडर्मिक मॉडल' हा सिद्धांतआता मागे माध्यम अभ्यासात मागे पडत चालल आहे. असाच एक माध्यम परिणाम सांगणारा सिद्धांत आहेयूझेस ऍन्ड ग्रॅटिफिकेशन्स'चा सिद्धांत. ब्लुम्लर आणि काट्ज यांनी हा सिद्धांत सर्वप्रथम मांडला. खरेतर हा वेगळासिद्धांत नसून माध्यम अभ्यासाकडे वाचक/प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून पाहण्याच्या ज्या अनेक प्रक्रिया तयारझाल्या त्यांचा समन्वय आहे. या सिद्धांतानुसार माध्यमांचे वाचक/प्रेक्षक हे माध्यमांची आणि त्यांच्या संदेशांचीआवश्यकतेनुसार आणि समाधानप्राप्तीसाठी निवड करतात. हा सिद्धांत असे गृहित धरतो की वाचक/प्रेक्षकांसमोरमाध्यमांची निवड करण्यासाठी पुरेसे पर्याय उपलब्ध असतात.
अधिक माहितीसाठी वाचा:
Blumler J.G. & Katz, E. (1974). The uses of mass communications: Current perspectives on gratifications research. Beverly Hills, CA: Sage.
Gauntlett, David (1995a), Moving Experiences: Understanding Television's Influences and Effects, John Libbey, London.
Bryant, Jennings, Zillmann, Dolf (2002) Media effects: advances in theory and research, Lawrence Erlbaum Associates
Schecheter, Danny, McChesney, Robert W., Brown, Jackson Jr.(1999) The More You Watch, The Less You Know, Seven Stories Press. '

(Journalism) जर्नलिझम - पत्रकारिता

(Journalism) जर्नलिझम - पत्रकारिता : वर्तमानपत्रे, रेडिओ, टेलिव्हिजन आणि माहिती महाजालाद्वारे शोधूनकाढलेली माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे याला सर्वसाधारणपणे पत्रकारिता असे म्हणतात. पत्रकारिताही एखादी वस्तू किंवा उत्पादन नव्हे तर एक प्रक्रिया आहे. काही दशकांपूर्वी ही प्रक्रिया एकतर्फी समजली जातहोती ज्यात पत्रकार जे सांगत होते ते प्रेक्षक ग्रहण करत होते. आता प्रेक्षकही या प्रक्रियेत सहभागी होतात, त्यांच्याकडे पाठवलेले संदेश स्वत:च्या अनुभवांच्या आधारे पडताळून पाहतात आणि त्या संदेशाबाबत स्वत:चेअनुमान काढतात.
पत्रकारितेच्या सामाजिक उद्दिष्टांबाबत खूप लिहिले गेले आहे. मॅक्नायरच्या मता प्रमाणे प्रत्यक्ष जगाचापत्रकाराने स्वत:पुरता अनुभवलेला आणि केलेला खुलासा, त्यावर एखाद्या माध्यमाच्या विशिष्ट आवश्यकतालक्षात घेऊन केलेले संस्कार ज्यायोगे तो अनेक लोकांना सांगता येईल या प्रक्रियेला पत्रकारिता म्हणतात. मॅक्वेलम्हणतो पत्रकारिता म्हणजे पैसे घेऊन केलेले लिखाण आणि दृकश्राव्य माध्यमांच्या बाबतीत असे जन माध्यम जेसर्वसामान्यजनांसाठी प्रसंगोचित नुकत्याच घडलेल्या घटना सांगते.
पत्रकारिता ही सर्वसामान्य लोकांना त्यांच्या भोवती असलेल्या जगाची जाण करून देणारी आणि त्या जगाशी कसेवागावे याबाबतचे निर्णय घेण्यासाठी लागणारी माहिती पुरविणारे साधन आहे हा विचार आता खूप बदलला आहे. पत्रकारितेच्या प्रक्रियेतून आता माध्यम संस्थांना माहितीचे पैशात मूल्य स्पष्ट कळले आहे. त्यामुळे पत्रकारिता हीकेवळ एक प्रक्रिया राहिली नसून त्यातून निघणारी माहिती, विश्लेषण, प्रतिमा, रचना इत्यादी हे पत्रकारितेच्याप्रक्रियेचे उत्पादन म्हणून आता ओळखले जाते आणि याचे मूल्य समाजातील वेगवेगळ्या स्तरावर आकारले जातेआहे. पत्रकारितेच्या प्रक्रियेला लागणारा पैसाही आता अनेक पटींनी वाढला आहे. जी के चेस्टर्टन यांनी पत्रकारितेचीव्याख्या करताना म्हटले की पत्रकारिता म्हणजे 'लॉर्ड जोंस मेला आहे' हे त्या लोकांना सांगणे ज्या लोकांना लॉर्डजोंस जिवंत होता हे सुद्धा माहिती नव्हते. पत्रकारिता म्हणजे आपली ती सहजप्रवृत्ती ज्यामुळे आपण रस्त्यावरघडलेल्या अपघाताकडे गर्दीत मान उँचावून पाहण्यास उद्युक्त होतो अशी परिभाषा सिम्प्सनने केली. अलिकडेपत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपामुळे कंड्या पिकवणारी पत्रकारिता, नव पत्रकारिता, शोध पत्रकारिता, टॅब्लॉइडपत्रकारिता असे पत्रकारितेचे प्रकार केले जाताहेत.

अधिक माहितीसाठी वाचा:

Curran, J and Seaton, J (1997) Power without Responsibility, Routledge.
Franklin B (1997) Newszak and News Media, Arnold.
Harcup, T (2004) Journalism:Principles and Practice, Sage
McNair, B, Hibberd, M and Schlesanger, P (2002) 'Public Access Broadcasting and Democratic Participation in the Age of Mediated Democracy', Journalism Studies, 3(3): 407-22.
McQuail, D (2000) Mass Communication Theory, Sage
Randall, D (2000) The Universal Journalist, Pluto
Simpson, J (2002) News from No Man's Land: Reporting the World, Macmillan.

(Ethics in Journalism) एथिक्स इन जर्नालिझम

(Ethics in Journalism) एथिक्स इन जर्नालिझम - पत्रकारितेतील नैतिकता : माहिती मिळवताना आणिमाध्यमांद्वारे ती प्रसारित करताना कुठल्या मूल्यांचे पालन करावे ज्यायोगे ती दुसर्यां ना क्लेषकारक, अन्यायकारक, बदनामीकारक असणार नाही याची काही मूलभूत तत्त्वे पत्रकारितेत सर्वमान्य आहेत. यामूल्यांमुळेच पत्रकारिता केवळ व्यवसाय नसून एक सामाजिक बांधिलकी आहे या विचाराला बळ मिळते. यानैतिकतेचे दोन उद्देश्य आहेत. पहिले म्हणजे पत्रकारिता ही सार्वजनिक हितासाठी आहे. एखादी बातमी सांगण्यातसार्वजनिक हित आहे हे पत्रकाराला त्या त्या देशाच्या कायद्याच्या कक्षेत सिद्ध करता आले पहिजे. दुसरे म्हणजेएखादी बातमी सांगत असताना ती मिळवताना आणि प्रसारित करताना पत्रकाराने हा भरवसा दिला पाहिजे कीत्याने आवश्यक कायदेशीर नैतिक बाबींचा विचार केला आहे, काळजी घेतली आहे. अशी काळजी आपण घेतलीहे देखील त्या त्या देशाच्या कायद्याच्या चौकटीत सिद्ध करण्याची जबाबदारी पत्रकाराची असते. त्याचबरोबरबातमी अचूक असली पाहिजे, निश्पक्ष असली पाहिजे ही जबाबदारी सुद्धा पत्रकाराची असते.
आल्बर्ट कामू या फ्रेंच लेखक-पत्रकाराने 1957 साली साहित्यासाठीचे नोबेल पुरस्कार स्वीकारताना म्हटले होते कीपत्रकारांची वैयक्तिक कमजोरी काहीही असो, त्यांच्या कामाचा उमदेपणा हा अशा दोन निष्ठांमधे आहे ज्या पाळणेकठीण आहे. पहिली म्हणजे आपल्याला जे माहिती आहे त्याबाबत खोटे बोलण्यास नकार देणे आणि दुसरी म्हणजेशोषणाचा प्रतिकार करणे. वर्तमान काळात पत्रकारांपुढे अनेक नैतिक आव्हाने आहेत. यातील पहिले आव्हान आहेते पत्रकारिता आणि राज्य यांच्यातील नात्यातील बदलत्या कक्षा. राज्याच्या भौगोलिक सीमा असतात मात्रपत्रकारांचे जग माहिती तंत्रज्ञानामुळे आता वैश्विक झाले आहे.
प्रत्येक व्यक्तीचे एक खाजगी क्षेत्र असते आणि लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला अशा खाजगी क्षेत्राचा अधिकारअसतो. पत्रकारिता जेव्हा माहितीचा, विचारांचा आणि अभिव्यक्तीचा अधिकार बजावते त्यावेळेस तिचा अशाखाजगी क्षेत्रात अधिक्षेप होतो. हा अधिक्षेप कितपत योग्य आहे हा नैतिकतेचा प्रश्न आहे.
पत्रकारितेचा संबंध वास्तवाशी, सत्याशी आहे. मात्र वास्तविकता कोणाची, सत्य कोणाचे हे नैतिकतेची प्रश्नहाताळावे लागतात. अशा परिस्थितीत उद्याच्या पत्रकारांसमोर हा प्रश्न आहे की पत्रकारिता करून ते जे निर्माणकरतात ती केवळ एक विक्रीमूल्य असलेली वस्तू आहे की त्यापेक्षा अधिक काही तरी?


Jeremy Iggers, (1998) Good News, Bad News - Journalism Ethics and the Public Interest, New York, Westview Press.
Elliot D. Cohen and Deni Elliott (1998) Journalism Ethics -- A Reference Handbook
Hausman, Carl. (1992) Crisis of Conscience - Perspectives on Journalism Ethics, New York, Harper Collins
Sanders, Karen (2003) Ethics & Journalism, London, Sage Publications.
Steven R. Knowlton, Patrick R. Parsons,(1995), The Journalist's Moral Compass: Basic Principles, Praeger.

(Communication) कम्युनिकेशन - संदेशनव्यवस्था/संज्ञापन

(Communication) कम्युनिकेशन - संदेशनव्यवस्था/संज्ञापन : एकमेकांना ओळखीची असलेली चिन्हेवापरून केलेली परस्पर क्रिया. या विषयाचा अभ्यास विसाव्या शतकात इतका व्यापक झाला की जवळ जवळसर्वच विषयांमधे याचा अंतर्भाव व्हायला लागला. युरोपीय संरचनावाद आणि रशियातील आकारवादातून सर्वमानवी भाषांमधे मूलभूत संरचना असते असा विचार पुढे आला. भाषांमधे सर्वसाधारणपणे विविध चिन्हके कुठलीआणि ती काही विशिष्ट संरचनेत कशी येतात या बद्दलचे सिद्धांत सॉस्युअने मांडले. या अभ्यासातून विविधचिन्हकांच्या व्यवस्थांचा अभ्यास भाषा आणि साहित्याच्या अभ्यासात सुरू झाला. लोक कथा, चित्रपट, नाटकयांमधील अशी चिन्हक आणि त्यांची केलेली उपाययोजना यांचा अभ्यास सुरू झाला.
याचदरम्यान अमेरिकेत तुलनात्मक भाषाशास्त्राचा अभ्यास सुरू झाला. बेंजामिन ली व्हॉर्फ आणि एडमंड सापीरयांनी विविध भाषा यांच्यात तुलनात्मक नातं असतं असा विचार मांडला. भाषांमुळे दृष्टिकोन तयार होतात आणिविविध भाषांमुळे एकाच वास्तविकतेचे विविध दृष्टिकोन तयार होतात असा विचार मांडला गेला. वेगवेगळ्यासंस्कृतीत राहणारे लोक वेगवेगळी भाषा बोलतात आणि त्यांची वास्तविकता वेगवेगळी असते. मुंबई हे एकबहुभाषिक आधुनिक शहर आहे की अनेक गावांचं एक कडबोळं असा प्रश्न निर्माण होण्यामागे भाषांमुळे तयारहोणार्याह वेगवेगळ्या संस्कृती आणि मुंबई नावाच्या एकाच वास्तविकतेबाबतचे विविध दृष्टिकोन आहेत.
फ्रांसमधील संरचनात्मक मानववंशशास्त्रज्ञ क्लॉड लेवाय स्ट्रॉस याने संदेशनव्यवस्थेला संस्कृतीच्या लग्न आणिधन या दोन पैलूंशी जोडलं. भाषांमधे आणि कलेमधे चिन्ह, नातेसंबंधांमधे स्त्रिया आणि अर्थव्यवस्थेत धन यांचेअभिसरण मूलत: एकाच प्रकारची संरचना दर्शवतात आणि यातून मानवी मनाचे काही वैश्विक पैलू स्पष्ट होतात.
अमेरिकेतील समाज शास्त्राचा अभ्यास आधुनिक जीवनाच्या सूक्ष्म प्रक्रियांचा अभ्यास करण्याकडे वळला तेव्हासंदेशनव्यवस्था पहिल्यांदा औपचारिकरित्या अभ्यासली गेली. एकीकडे घटनात्मक आणि व्यावसायिक दृष्ट्यासार्वभौम तर दुसरीकडे व्यावसायिक आणि राजकीय दृष्ट्या आणि एकमेकांपासून अनभिज्ञ असा आधुनिकसमाज स्वत:शी आणि इतरांशी संवाद कसा साधतो, या प्रश्नाकडे व्हॅंस पॅकार्ड, मायकल शुड्सन सारख्याअभ्यासकांनी लक्ष वेधले. अशा जन समाजात जन माध्यमांचे महत्त्व वाढले ते जाहिरात, पत्रकारिता, जनसंपर्क, प्रचार इत्यादींमुळे. जन मनोरंजनाचा या अनोळखी पण सार्वभौम व्यक्तींवर होणारा परिणाम हा महत्त्वाचा विषयठरला.
संदेशनव्यवस्था आणि माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार वाढत गेला आणि मग व्यावसायिक अभ्यासक्रमातही संज्ञापनहा विषय महत्त्वाचा झाला. उत्तराधुनिक अमेरिका, जपान आणि यूरोप येथे ग्राहकांच्या वागण्याचा सखोलअभ्यास संदेशनव्यवस्थेच्या अभ्यासामुळे शक्य झाला आणि हे देश आर्थिक दृष्ट्या पुढारले. त्याचवेळी सामान्यनागरिकांना आपले लोकशाही हक्क बजावण्यासाठी आणि नागरी समाज राजकीय सामाजिक दृष्ट्या सक्षमकरण्यासाठी माध्यम, जनसंपर्क आणि जाहिरात यांचा अभ्यास अमेरिकेतील अभ्यासक्रमांमधे समाविष्टकरण्यात आला.
कॅनडा येथील मार्शल मॅक्लुहान या वाङ्मयीन इतिहासाच्या अभ्यासकाने मानसशास्त्र आणि हॅरॉल्ड इनिस याच्यासंज्ञापन तत्त्वज्ञानाचा उपयोग करून संदेशनाच्या अवास्तव प्रसारणाचे सिद्धांत मांडले. मॅक्लुहानची सहज शैलीअभ्यासक, माध्यम, जाहिरात आणि टेलिव्हिजन व्यावसायिक आणि सामान्य वाचकांनाही आवडली.
याचवेळी राज्यकर्ते आणि सरकारे यांनाही संज्ञापनाची आवश्यकता, प्रसार, परिणाम याचा अंदाज यायला लागला. शीत युद्ध असो वा आफ्रिकापासून व्हिएतनामपर्यंतचे स्वातंत्र्यसंग्राम असो या सगळ्यात संज्ञापनाची भूमिकाअभ्यासण्याजोगी होती हे लक्षात येऊ लागले. विशेषत: सैनिकी सामर्थ्य वापरून संघर्ष जिथे होतो तेथे आपआपलीबाजू कशी योग्य आहे हे दर्शविण्यासाठी संज्ञानाचा उपयोग झाला.
रेमण्ड विलियम्स, मार्कूस आणि एंझंसबर्जर या अभ्यासकांनी संदेशन अभ्यासाला शास्त्रीय टीकात्मक दृष्टी दिलीआणि संदेशनव्यवस्था अभ्यासाला बौद्धिक आणि तात्त्विक अधिष्टान प्राप्त करून दिले.
या सगळ्या साथ मिळाली ती उत्तरोत्तर प्रगती होत गेलेल्या माहिती तंत्रज्ञानाची ज्यामुळे संदेशनाचे स्वरूप आणिआवाका वाढतच गेला आहे.

अधिक माहितीसाठी वाचा:


पाटणकर, वसंत (2006), साहित्यशास्त्र: स्वरूप आणि समस्या, पद्मगंधा प्रकाशन.
मालशे, मिलिंद (2004), आधुनिक भाषाविज्ञान: सिद्धांत आणि उपयोजन, लोकवाङ्मय गृह
Levi-Strauss, Claude (1964) Structural Analysis in Linguistics and Anthropology in Hymes.
Sapir, Edward (1958) Selected Writings of Edward Sapir in Language, Culture and Personality (Ed by DG Maandelbaum), Berkeley, California, University of California Press.
Saussure, Ferdinand de (1974) Course in General Linguistics (Translated from French by Wade Baskin) Fontana/Collins.
Whorf, B.L. (1956) Language, Thought and Reality (Ed J Bcarroll), Cambridge, Mass: MIT Press

(Self Censorship) सेल्फ सेंसरशिप

(Self Censorship) सेल्फ सेंसरशिप एखाद्या व्यक्तीने अथवा संस्थेने स्वत:हून आपल्या विचार आणिअभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध घालण्याला सेल्फ सेंसरशिप म्हणतात. अशा प्रकारचे निर्बंध स्वत:वर लागू करणेबरे की राज्य किंवा प्रशासनाकरवी तसे निर्बंध घालणे बरे यावर बरीच मते आहेत. विचार आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे भारताच्या घटनेप्रमाणे जगातील इतर देशातील घटनांमधेसुद्धा मूलभूत हक्क म्हणून मान्य केले आहे. विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर उपभोगायचे असेल आणि अशा स्वातंत्र्यातून लोकशाही चालवायची असेलतर माध्यमे खाजगी मालकीची असणे आवश्यक आहे असा एक मतप्रवाह आहे. मात्र खाजगी मालकीची माध्यमेही नेहमीच लोकहित जपतील काय की व्यावसायिक फायद्यासाठी लोकहिताला घातक अशा गोष्टी करतील? अशा परिस्थितीत माध्यमांच्या विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दुरुपयोगाला निर्बंध कोण घालणार? याप्रश्नांच्या चर्चेतून माध्यमांनी काय छापावे, दाखवावे याबाबत समाजहित, विचार आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या तत्त्वांच्या दृष्टीने आणि लोकशाहीची मूल्ये जपण्याच्या दृष्टीने माध्यमांनी स्वत:वर निर्बंध घालावेअसा विचार जास्त योग्य आहे असे बहुमत आहे.
मात्र स्वत:वर निर्बंध घालत असताना पत्रकारितेच्या काही मूल्यांना जपावे लागते आणि ते कठीण होऊन बसते. पत्रकारितेत वस्तुनिष्ठतेला फार महत्त्व आहे. जर पत्रकारांनी किंवा माध्यम संस्थांनी स्वत:वर निर्बंध घातले तरवस्तुनिष्ठता कशी राखता येईल? कारण कुठली बातमी कशी आणि किती महत्त्व देऊन छापायची हा निर्णय त्यात्या पत्रकाराच्या आणि माध्यम संस्थेच्या अख्त्यारीतला प्रश्न होऊन जातो. बातमी छापलीच नाही तर वाचकांनात्या घटनेबाबत कळणे शक्यच नाही आणि त्यावर विचार करणे, काही मत बनवणेही शक्य नाही.
वाढत्या व्यावसायिकतेमुळे माध्यम संस्था नेहमीच लोकहित जपण्यासाठी स्वत:वर निर्बंध घालत नसतात तरव्यावसायिक नफा किंवा नुकसान पाहून असे निर्णय घेतले जातात. यात माध्यम संस्थांचा जरी फायदा होतअसला तरी लोकहिताचा बळी जाण्याची शक्यता आहे.
युद्धाच्या प्रसंगी पत्रकाराने शत्रू राष्ट्राबाबतच्या सकारात्मक बातम्या द्याव्यात काय? आपल्याच देशाबाबतचेनकारात्मक चित्र तयार होईल अशा बातम्या पत्रकारांनी द्याव्यात काय? देशाची सुरक्षितता, राजकारण आणिअर्थकारणासारख्या विषयांबाबत स्वत:वर निर्बंध घालणे अनेकदा आवश्यक असते मात्र अशाप्रकारच्यानिर्बंधांमुळे विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा पडतात.

(Public Relations) पब्लिक रिलेशन्स

(Public Relations) पब्लिक रिलेशन्स – जनसंपर्क. कुठल्याही संस्थेचा अथवा व्यक्तिचा सार्वजनिक चेहरामांडणे हे जनसंपर्काचे सर्वसाधारणपणे काम असते. संस्थेची तत्त्वे उद्दिष्ट्ये त्या त्या संस्थेशी निगडितलोकांसमोर आणणे त्याबाबतचे विचार लोकांकडून जाणून घेणे हेही अपेक्षित असते. त्याचबरोबर संस्थेचादृष्टिकोन लोकांना पटवून देणे अपेक्षित असते.
भारतात पत्रकारांचा आणि जनसंपर्क व्यावसायिकांचा संबंध फार मजेशीर टप्प्यावर येऊन ठेपला आहे. गेल्या दोनदशकात अनेक ज्येष्ठ पत्रकार जनसंपर्क अधिकारी झाले आहेत तर आता काही जनसंपर्क व्यावसायिक पत्रकारझाले आहेत. वर्तमानपत्रे अधिकाधिक व्यावसायिक होत आहेत. परिणामी प्रत्येक माध्यम संस्थेचे व्यावसायिकहितसंबंध निर्माण झाले आहेत. हे हितसंबंध केवळ आर्थिक किंवा व्यावसायिक संस्थांशी नसून राजकीय आणिसामाजिक संस्थांशीही जोडले गेले आहेत. अशा परिस्थितीत पत्रकारांना एखाद्या संस्थेची किंवा व्यक्तीची माहितीहवी असल्यास ती अधिकृत सूत्रांकडून मिळणे अधिक प्रशस्त असते. मात्र अशी माहिती नेहमीच संपूर्णपणे खरीअसेल असे नाही. याचे कारण जनसंपर्काचे एक काम म्हणजे व्यक्ती किंवा संस्थेची सार्वजनिक प्रतिमा जपणे हेहीआहे.
जनसंपर्काचे एक उद्दिष्ट्य चांगली प्रतिमा बनविणे आणि असलेली प्रतिमा जपणे हे आहे. जनसंपर्क व्यावसायिकअनेकदा माध्यमांचा उपयोग विषय नेपथ्य तयार करण्यासाठी करतात. सतत तीव्र होत जाणार्यां स्पर्धेमुळेजनसंपर्क व्यावसायिक विषय नेपथ्य तयार करण्यात अधिकधिक तरबेज होत आहेत. एरवी ज्या घटनेची बातमीहोणार नाही अशा एखाद्या घटनेचे नेपथ्य बदलून, संदर्भाची चौकट बदलून त्या घटनेची बातमी बनवण्यात आताजनसंपर्क व्यावसायिक पटाईत झाले आहेत. अशावेळी जनसंपर्क व्यावसायिक नेहमीच आपली उद्दिष्ट्ये स्पष्टकरीत नाहीत. त्यामुळे पत्रकार आणि जनसंपर्क व्यावसायिक यांच्यामधील नात्यात कुशंकेला खूप वाव असतो. जनसंपर्क अधिकार्यायकडून मिळालेली बातमी छापण्यात आपला वापर तर करून घेतला जात नाहिए ना असाप्रश्न पत्रकारांना सतत भेडसावत असतो. अनेक व्यावसायिक, राजकीय आणि सामाजिक संस्था व्यक्तीजनसंपर्काचा उपयोग पत्रकारांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी करताना दिसतात.
त्याचबरोबर पत्रकारसुद्धा जनसंपर्क अधिकार्यांयकडून मिळणार्याव माहितीवर अधिकधिक अवलंबून होतानादिसतात. एकतर माहिती अधिकृत असते आणि दुसरे ती कुठल्याही कष्टाशिवाय मिळते.
जनसंपर्काच्या कामाचे मूल्यमापन करणे कठीण आहे. एखाद्या संस्थेची किंवा व्यक्तीची प्रतिमा चांगली झालीआहे याचे परिमाण काय असावेत? उदाहरणार्थ जाहिरात केली तर खप वाढतो असे दाख़वता येईल. मात्रजनसंपर्कामुळे प्रतिमा उजळली असे दाखवण्याजोगे काही नाही. त्यामुळे जनसंपर्क म्हणजे माध्यम संपर्क असासमज भारतात रूढ झाला आहे. यामुळे एखाद्या संस्थेबाबत अथवा व्यक्तीबाबत किती बातम्या कुठल्यावर्तमानपत्रात छापून आल्या यावर जनसंपर्काची परिणामकारकता ठरविली जाते. परदेशात मात्र जनसंपर्क हासंवाद शास्त्रातील एक महत्त्वाचा विषय मानला जातो. अनेकदा तर संस्था जाहिरात विभागापेक्षा जनसंपर्कविभागावर जास्त पैसे खर्च करतात.

(Convergence) कंव्हर्जंस - एककेंद्राभिमुखता

(Convergence) कंव्हर्जंस - एककेंद्राभिमुखता. संगणक, रेडिओ, टी व्ही, वर्तमानपत्रे आणि माहितीतंत्रज्ञानाची विविध उपकरणे, उदाहरणार्थ मोबाईल फोन इत्यादी यांमधील तांत्रिक आणि उपयोगितेच्या दृष्टीनेअंतर हळू हळू कमी होत चालले आहे. यामुळे या विविध उपकरणांमध्ये एककेंद्राभिमुखता आली आहे. याचापत्रकारितेवर परिणाम झाला आहे. आता पत्रकारांना अनेक तांत्रिक कौशल्ये आत्मसात करावी लागतात. त्याचबरोबर पत्रकारिता 'जागतिक' झाली आहे. माहिती महाजालामुळे पत्रकारितेची तत्त्वे आणि मूल्ये ज्यालामहिती आहेत असा कोणीही आज पत्रकारिता करू शकतो. इतकेच नव्हे तर प्रेक्षकही या प्रक्रियेत कधी नव्हेइतक्या प्रमाणात सर्व पातळींवर सहभागी होऊ शकतात. हे सगळे तंत्रज्ञानाच्या एककेंद्राभिमुखतेमुळे शक्य झालेआहे.
तंत्रज्ञानाच्या एककेंद्राभिमुखतेमुळे माध्यमांसंबंधी कायदेही बदलण्याची आवश्यकता आता जाणवत आहे. आजआपल्याकडील वर्तमानपत्रे इत्यादी छापील पत्रकारितेसाठी प्रेस काउंसिल कायदा आहे तर टी.व्ही आणिरेडिओसाठी प्रसार भारती कायदा आहे. मात्र या दोन्ही माध्यमांची एककेंद्राभिमुखता जेथे होते त्या मोबाइलफोनवरील पत्रकारितेबाबत किंवा महाजालाबाबत कायदे सक्षम नाहीत. अनेक माध्यम संस्था आणि पत्रकार आजविविध माध्यमप्रकारांवर काम करत असतात. त्यांच्या कामाचे स्वरूप आणि त्या कामातून उत्पन्न होणार्यामाहितीवर कुठलेच नियंत्रण शक्य होत नाही.
एककेंद्राभिमुखतेमुळे माध्यमे माध्यमरूपांतर (mediamorphosis) ही प्रक्रियाही होते आहे.
ज्याप्रमाणे तंत्रज्ञानाच्या बाबतीत एककेंद्राभिमुखता होते आहे त्याचप्रमाणे सांस्कृतिक, सामाजिक, अर्थशास्त्रीयआणि जागतिक एककेंद्राभिमुखता होते आहे.

अधिक माहितीसाठी वाचा:
Jenkins, Henry (2006). Convergence Culture: Where Old and New Media Collide. New York: New York University Press.
Jenkins, Henry (2003). Rethinking Media Change: The Aesthetics of Transition. Media in transition. Cambridge. Mass.: MIT Press

By- Sanjay Ranade,
Dept of Communication and Journalism,
University Of Mumbai.

(Censorship) सेंसरशिप

(Censorship) सेंसरशिपसेंसर म्हणजे मुद्रण नियंत्रक. अशा नियंत्रण करण्याला सेंसरशिप म्हणतात. यानियंत्रण प्रक्रियेचे काही घटक आहेत. एक म्हणजे असे नियंत्रण केवळ मुद्रण क्षेत्राशी सबंधित नसून माहिती आणितंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वच्या सर्व माध्यमांशी सबंधित आहे. दुसरे म्हणजे माहिती मिळवण्यावर आणि तिच्याप्रसारणावर नियंत्रण करता येऊ शकते. तिसरे म्हणजे असे नियंत्रण केवळ सरकारी पातळींवर आणि सरकारीसंस्थांकडूनच होते असे नाही तर समाजाच्या विविध स्तरावर असे नियंत्रण केले जाते. शेवटचे म्हणजे असेनियंत्रण सरकारी पातळीवर होतेच, मग ते सरकार कुठल्या तत्त्वांचा, मतांचा, विचारांचा अवलंबन करत आहेयामुळे फरक पडत नाही.
भारतामध्ये अशा नियंत्रणाला ब्रिटिश काळातच सुरुवात झाली होती. 2 सप्टेंबर 1780 रोजी जेम्स ऑगस्टस हिकीयाच्या बंगाल गझेट या वर्तमानपत्राच्या वितरणावर ब्रिटिशांनी बंदी आणली होती. 1823 साली जेम्स सिल्कबकिंघमच्या कलकत्ता गझेट वर आणलेली बंदी सर्वाधिक गाजली कारण बकिंघमने या बंदी विरूद्ध इंग्लिशकोर्टात दाद मागितली आणि 1834 साली त्याला वर्षाला पाचशे पाउंड इतकी रक्कम भरपाई म्हणून देण्यात आली. 13 मे 1799 साली लॉर्ड वेलेस्ली याने भारतात वर्तमानपत्रांवर नियंत्रण लागू केले. याअगोदर प्रत्येकवर्तमानपत्राला मजकूर छापण्याअगोदर सरकारला दाख़वणे बंधनकारक होते. वेलेस्लीने प्रत्येक वर्तमानपत्रावरसंपादक, मुद्रक आणि मालक यांची नावे प्रसिद्ध करणे बंधनकारक केले.
यानंतर अनेक कायद्यांद्वारे माहितीवर आणि पर्यायाने वर्तमानपत्रांवर नियंत्रण करणे सुरूच होते. याप्रक्रियेतूनच प्रेस काउंसिल ऑफ इंडियाचा जन्म झाला. वर्तमानपत्रांनी स्वत: स्वत:वर नियंत्रण ठेवावे असा यामागचा हेतू होता.
राजकीय अर्थकारणाचा सिद्धांत मांडणार्यां अभ्यासक़ांनी म्हटले आहे की खाजगी संस्थांनी गेल्या दोन दशकातमाध्यम संस्थांवर आपली मक्तेदारी सिद्ध केली आहे आणि जाहिरातदारांना हाताशी धरून त्यांनी आता एकप्रकारेसंमतीचे उत्पादन आरंभिले आहे. पत्रकार स्वत:वर नियंत्रण लादतात आणि यातून या ख़ाजगी माध्यमसंस्थांना असेसंमतीचे उत्पादनकरता येते असे या अभ्यासकांचे मत आहे. यासाठी आता सरकारी नियंत्रणाचीआवश्यकता उरलेली नाही.

अधिक माहितीसाठी वाचा:
Durga Das Basu, Law of the Press, 2002, Wadhwa Nagpur.
Parthasarthy Rangaswami, Journalism in India, From the earliest times to the present day, Sterling Publishers Private Limited, 1989.
Herman and Noam Chomsky, Manufacturing Consent

By Sanjay Ranade,
Dept of Communication and Journalism,
University Of Mumbai.

Broadcasting) ब्रॉडकास्टिंग – प्रक्षेपित करणे:

(Broadcasting) ब्रॉडकास्टिंग – प्रक्षेपित करणे: पेरणीच्यावेळी शेतकरी शेतावरती बिया फेकतो. त्याप्रक्रियेला इंग्रजीत ब्रॉडकास्टिंग असे म्हणतात. या प्रक्रियेची काही वैशिष्ट्ये माध्यम प्रसारणात सारखी आहेत. उदाहरणार्थ बिया फेकल्या तर त्या कुठे पडतील, रुजतील किंवा नाही याचा केवळ अंदाज बांधता येतो. त्याबद्दलनिश्चितपणे काही सांगता येत नाही. माध्यम प्रसारणाचे असेच असते.
आकाशवाणी किंवा दूरदर्शनवरून माहिती प्रक्षेपित होते म्हणजेच ब्रॉडकास्ट होते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातीलशोधाने माहितीच्या प्रसारण आणि प्रक्षेपणात आमूलाग्र बदल घडवून आणला. मार्शल मॅक्लुहानने माध्यमांमुळेज्ञानेंद्रियांचा विस्तार होतो असा जो सिद्धांत मांडला तो प्रक्षेपण आणि विशेषत: दूरदर्शनमुळे थोडा बदलावा लागला. याचे कारण टी.व्ही हे उपकरण एकापेक्षा अधिक ज्ञानेंद्रियांचा विस्तार करते.
प्रक्षेपणामुळे जे माध्यम खाजगी होते ते सार्वजनिक झाले. माध्यमांना नवे सामाजिक परिमाण लाभले. अनुभवाच्या कक्षा वाढल्या बदलल्या. एवढेच नव्हे तर ज्ञानाच्या परिभाषाही बदलल्या. उदाहरणार्थ डॉल्फिन हाजीव प्रत्यक्ष पाहिला नसला तरी त्याबद्दलचे ज्ञान आता आत्मसात करणे सहज शक्य आहे. एखाद्याभूप्रदेशाबद्दलचे ज्ञान, एखाद्या समाजाबाबतचे ज्ञानही आता प्राप्त करता येऊ शकते. त्यासाठी प्रत्यक्ष अनुभवाचीआवश्यकता नाही. चंद्र, ग्रह, तारे यांच्या बद्दलचे ज्ञान मिळवणे आता सहज शक्य आहे. संगीताच्याबाबतीत तरप्रक्षेपण तंत्रज्ञानाने आमूलाग्र बदल घडवला आहे. आता प्रत्यक्ष संगीत कार्यक्रमाला हजर राहण्याची आवश्यकतानाही. तो अनुभव बसल्या ठिकाणी घेणे आता शक्य आहे.

अधिक माहितीसाठी वाचा:
Ivo Josipovi, The Mass Media and Musical Culture, International Review of the Aesthetics and Sociology of Music, Vol. 15, No. 1. (Jun., 1984), pp. 39-51.

By - Sanjay Ranade
Dept of communication and Journalism
University of Mumbai.

(Bias) बायस – प्रवृती:

(Bias) बायस – प्रवृती: प्रवृती माध्यमांची, पत्रकारांची, प्रेक्षकांची, जाहिरातदारांची आणि माध्यमांमध्ये अनेकअर्थाने गुंतवणूक करणार्या सर्व प्रकारच्या लोकांची असते. काही माध्यमे कालातीत असतात. उदाहरणार्थ दगड. अशा माध्यमांचा वापर केल्यास माहितीही कालातीत होते. मात्र माहितीचे प्रसरण मर्यादित होते. काही माध्यमांनास्थलाच्या मर्यादा कमी असतात. उदाहरणार्थ कागद. कागदावरील माहिती अधिक व्यापक क्षेत्रावर प्रसरण पावूशकते. मात्र कागदाचा काळ दगडापेक्षा कमी असतो. साम्राज्यांचा काळ आणि क्षेत्र हे त्या साम्राज्यात वापरातयेणार्याा माध्यमांवर आणि त्यांच्या प्रवृतींवर अवलंबून असतो असा सिद्धांत हॅरॉल्ड इनिस या कॅनेडातीलअभ्यासकाने सर्वप्रथम मांडला. माध्यमांच्या प्रवृत्ती असतात त्या ओळखणे गरजेचे असते यावरून मार्शलमॅक्लुहान याने माध्यमे ही माणसाच्या ज्ञानेंद्रियांचा विस्तार करतात असा सिद्धांत पुढे मांडला. उदाहरणार्थ रेडिओहा माणसाच्या श्रवणेंद्रियाचा तर वर्तमानपत्रे आणि कॅमेरा डोळ्याचा विस्तार करतात.
माध्यमांच्या प्रवृत्तींमुळे संदेशवहनाला मर्यादा पडतात आणि काहीवेळा केवळ माध्यम प्रवृतीमुळे संदेश पोहोचतनाही अथवा त्यातून वेगळाच अर्थ पोहोचतो. त्यामुळे संदेशाबरोबर तो कुठल्या माध्यमाद्वारे पोहोचवला जातोआहे याला देखील महत्त्व प्राप्त होते. एखादा संदेश जर लोकांच्या पचनी पडणारा नसेल तरी योग्य माध्यमवापरले तर लोकांपर्यंत पोहोचवता येतो. म्हणजेच संदेशापेक्षा कधी कधी माध्यम आणि त्याच्या प्रवृतींमुळे संदेशजास्त परिणामकारक होतो. य़ावरूनच माध्यम म्हणजे एकप्रकारची संदेशाची मालिश (medium is the massage) किंवा माध्यम म्हणजेच संदेश (medium is the message) असा सिद्धांत मॅक्लुहानने मांडला.
प्रेक्षकांच्याही प्रवृत्ती असतात आणि पत्रकारांच्याही. वस्तुनिष्ठता ही जरी पत्रकाराला बंधनकारक असली तरी तीनेहमीच शक्य नसते याचे कारण म्हणजे माणसातील प्रवृत्ती. अशा प्रवृत्ती पूर्णपणे नष्ट करणे शक्य नसते. म्हणून न्याय्य असणे, समतोल राखणे, सर्व बाजू पैलू मांडणे इत्यादींचा आग्रह धरला जातो. माहितीच्यासार्वत्रिकरणाचा जसा प्रेक्षकांवर परिणाम होतो तसाच तो पत्रकारांवरही होतो. माहिती सहज उपलब्ध होते, अनेकमार्गांनी उपलब्ध होते यामुळे कुठली बातमी महत्त्वाची आहे याचे आकलन कठीण होऊन जाते. मग व्यक्तिगतप्रवृत्तींचा प्रभाव वाढतो. हा प्रभाव नकळत, सूप्त असू शकतो.
प्रेक्षकांच्या प्रवृतींचा माध्यमांवर प्रभाव असतो. प्रेक्षक जर स्वत:च्या वास्तवाबाबत आणि त्यातून निर्माणहोणार्याा त्यांच्या प्रवृत्तींबाबत चिकित्सक असतील तर पत्रकारितेचे स्वरूप तसे होते मात्र जर प्रेक्षक आग्रहीआणि असहिष्णु असतील तर पत्रकारितेचे स्वरूपही तसेच होते.

Translated By - Sanjay Ranade
Dept Of Communication and Journalism,
University of Mumbai

अधिक माहितीसाठी वाचा:
Glasgow Media Group (1976) Bad News, London: Routledge and Kegan Paul.

(Audience) ऑडियंस – प्रेक्षक:

(Audience) ऑडियंस – प्रेक्षक: वर्तमानपत्रांचे वाचक, आकाशवाणीचे श्रोते आणि दूरदर्शन आणि इंटर्नेटचे श्रोते-प्रेक्षक या सगळ्यांना ‘प्रेक्षक’ ही संज्ञा लागू होते. अनेक अभ्यासकांनी पत्रकार आणि प्रेक्षक यांच्यातील नात्याचा अभ्यास केला आहे. गांस (1980), श्लेसिंजर (1987), हॅरिसन (2000), लांस बेनेट, मिंडिच इत्यादींच्या अभ्यासावरून असे लक्षात येते की पत्रकार आणि प्रेक्षक आणि माध्यम संस्था आणि प्रेक्षक यांचे नाते वेगवेगळे असते. त्याचबरोबर माध्यमे आणि प्रेक्षक एकमेकांवर परिणाम करतात. पत्रकार हे प्रेक्षकांकडे संख्यात्मक दृष्टिने पाहत नाहीत तर गुणात्मक दृष्टिने पाहतात. त्यामुळे प्रेक्षक कुठल्या विचारसरणीचे आहेत, त्यांची भावात्मक, राजकीय, सामाजिक व नैतिक घडण कशी आहे इत्यादींचा विचार पत्रकार जास्त करतात. याउलट माध्यम संस्था हे प्रेक्षकांकडे संख्यात्मक दृष्टीने पाह्तात. यामुळे कधीकधी माध्यम संस्था आणि पत्रकार यांच्यात संघर्ष निर्माण होतो. उदाहरणार्थ संपादकीय धोरणामुळे जर पाच टक्के प्रेक्षकांनी वर्तमानपत्र बदलले किंवा दूरचित्रवाणीची वाहिनी बदलली तर माध्यम संस्थेतील व्यवस्थापन संपादकीय विभागाला आपले धोरण बदलण्याचा आग्रह धरु शकते. त्याउलट संपादकीय विभाग असे म्हणेल की ज्याअर्थी पंच्याण्णव टक्के लोकांनी तेच वृत्तपत्र किंवा वाहिनी कायम ठेवले आहेत त्याअर्थी लोकांना बदलले संपादकीय धोरण मान्य आहे व तेच कायम ठेवावे.

वाचकांची पत्रे, एसएमएस, ईमेल इत्यादींद्वारे पत्रकार व माध्यमे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव आणि विचारांची दिशा पडताळून पाहत असतात. प्रेक्षकही आपली मते माध्यमांपर्यंत पोहोचवत असतात. जे लोकहिताचे असते ते नेहमीच सर्व लोकांच्या पचनी पडणारे नसते आणि लोकांना जे आवडते ते नेहमीच हिताचे नसते. यामुळे लोकहित जपावे की लोकांची आवडनिवड पुरवावी असा प्रश्न पत्रकार आणि माध्यम संस्थांना सतावत असतो व त्यांच्यामधील संघर्षाचे कारणही होतो.

या संघर्षातूनच दोन प्रक्रिया सुरू होतात. एक आहे audience fragmentation किंवा प्रेक्षकांचे अंशीकरण आणि दुसरी आहे audience segmentation किंवा प्रेक्षकांचे विभाजन. प्रेक्षकांपुढील माध्यमांचे अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे प्रेक्षक कुठल्याही एका माध्यमाचे किंवा माध्यम उत्पादनाचे अंशत:च ग्राहक होतात. अशामुळे जाहिरातदाराला केवळ वाचक संख्या किंवा प्रेक्षक-श्रोत्यांची संख्या यावरून आपली जाहिरात किती जणांपर्यंत पोहोचली हे सांगता येत नाही. यावर उपाय म्हणून जाहिरातदार विविध माध्यमांतून आणि माध्यम उत्पादनांतून आपल्या जाहिरातीचा मारा करतात.

त्याचबरोबर असेही आढळले आहे की प्रेक्षक हे सुप्त ग्राहक नव्हेत. ग्राहकांच्या सामाजिक, राजकीय, पारिवारिक, आर्थिक परिस्थितीचा परिणाम ते जे माध्यम आणि माध्यम उत्पादन निवडतात यावर पडतो व त्यानुसार प्रेक्षकांचे विविध सामाजिक, राजकीय, आर्थिक इत्यादी गटात विभाजन शक्य होते. असे विभाजन केल्यास कुठल्या वस्तूच्या जाहिराती कुठे जास्त प्रमाणात द्याव्यात हा निर्णय घेणे सोपे जाते.

आज प्रेक्षकांचे अंशीकरण आणि विभाजन करणे हे शिस्तबद्ध पद्धतीने विपणन शास्त्र आणि व्यवस्थापन शास्त्रात शिकवले जाते.


Translated By- Sanjay Ranade,

Dept of Communication and Journalism,

University of Mumbai.

अधिक माहितीसाठी वाचावे:

Allan, S. (1999) News Culture Buckingham: Open University Press.

Gans, H J (1980) Deciding What’s News. London: Constable

Harrison, J (2000) Terrestrial TV News in Britain: The Culture of Production, Manchester, Manchester University Press.

Schlesinger, P (1987) Putting Reality Together, London: Metheun

W Lance Bennett (2006), News: The Politics of Illusion, Longman.

David Mindich (2005), Tuned Out: Why Americans Under 40 Don't Follow the News, OUP.

'जाहिरात करणे'-ऍड्व्हर्टायझिंग (Advertising)

'जाहिरात करणे'-ऍड्व्हर्टायझिंग (Advertising) महसूलाशिवाय धंदा नाही. वर्तमानपत्रे, नियतकालिके, सार्वजनिक असो वा खाजगी प्रसारण सेवा, सगळ्यांना महसूल हवाच. माध्यम संस्थांसाठी जाहिराती हे महसूलाचे मुख्य स्रोत आहे. 2004 ते 2005 या वर्षादर्म्यान जगभरातील गुंतवणुकदारांनी भारताच्या माध्यम आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात वीस अब्ज रुपये एवढी रक्कम गुंतवली. याचे कारण असे की आज भारत माध्यम आणि मनोरंजनाच्या क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. याची काही विशिष्ट कारणे आहेत. आपल्याकडे लोकशाही व्यवस्था आहे. आपली घटना प्रत्येक भारतीय नागरिकाला जाहीर मतप्रदर्शनाचा अधिकार देते. हा अधिकार आजही लोक वापरतात. भारतात सामाजिक आणि राजकीय बाबतीत लोकांमध्ये जागृती वाढते आहे. शिक्षणाचा प्रसार होत आहे त्यामुळे लोकांमध्ये आपल्या भोवतीचे वास्तव जाणून घ्यायचा ध्यास आहे. मध्यम वर्गाची वाढ होते आहे ज्यामुळे खर्च करायची क्षमताही वाढत आहे. माहिती तंत्रज्ञानात होणार्याी संशोधनामुळे माध्यम क्षेत्र अधिकाधिक समृद्ध आणि सक्षम होत आहे.
जाहिरातदार आणि पत्रकार यांच्यातला संघर्ष पारंपरिक आहे. दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नाही आणि दोघे एकमेकांवर कुरघोडी करत राहतात. माध्यमांच्या जाहिरातदारांवरील अवलंबितेमुळे उत्पादन आणि वितरण या दोन्ही क्षमतांवर परिणाम होतो. यामुळे महसूलासाठी आणि उद्योगात वाढ होण्यासाठी जाहिरातींवर भर द्यावा लागतो. मात्र याचा परिणाम पत्रकारितेच्या नैतिकतेवर होणार नाही, पत्रकारांच्या कर्तव्य बजावण्यावर होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते.
पत्रकार आणि जाहिरातदार यांच्यातील संघर्ष जाहीर होत नाही तर सूक्ष्म पातळीवर होत असतो. या संघर्षाचे पडसाद माध्यमांच्या प्रशासनावर पडतात तसेच सत्तेसाठी माध्यम संस्थांत होणार्यां साठमारीवर आणि माध्यमांतर्गत संघर्षावरही उमटतात.
एवढे मात्र खरे की जाहिरातींशिवाय आधुनिक माध्यमे मोठ्या संख्येपर्यंत पोहोचू शकत नाही. जाहिरातींमुळेच आज भारतातील वर्तमानपत्रांची किंमत सामान्य वाचकांच्या आवाक्यात आहे. लोकशाहीची तत्त्वे रुजवण्यात आणि जपण्यात जसा पत्रकारांचा वाटा आहे तसाच तो जाहिरातदारांचाही आहे कारण जी माध्यमे पत्रकार वापरतात ती माध्यमे सुरळीत चालवायला जाहिराती लागतात. पत्रकारांनी आणि जाहिरातदारांनी जर आपली नैतिकता सोडली नाही आणि समाजाप्रती आपली कर्तव्ये काय आहेत याची जाणीव ठेवली तर ते समाजाच्या दृष्टीने हितकारक होते मात्र यातील एकाने नैतिकतेचे आणि कर्तव्याचे भान सोडले तर समाजाचे नुकसान होते.
जाहिराती आणि प्रसार माध्यमे यांचा संबंध आता खूपच बदलला आहे. पूर्वीप्रमाणे आता एक वर्तमानपत्र दुसर्याध वर्तमानपत्राशी किंवा वर्तमानपत्रांशीच केवळ स्पर्धा करत नाही तर माध्यमांतर्गत स्पर्धा ही होत असते. म्हणजे वर्तमानपत्रे, टी.व्ही चॅनल्स, नीयतकालिके, रडिओ, इंटर्नेट या सर्व माध्यमांमध्ये स्पर्धा होत असते. जाहिरातदार जाहिरातीसाठीचा वार्षिक खर्च ठरवताना कुठल्या माध्यमाला किती जाहिराती द्यायच्या आणि मग त्या त्या माध्यमातील कुठल्या माध्यम संस्थेला किती जाहिराती द्यायच्या हे ठरवतात. अनेक आवृत्त्या आणि अनेक माध्यमं यांमुळे विपणन आणि वितरण यांना खूप महत्त्व आलं आहे. बातम्या ह्या केवळ वाचनीय नसून उपभोग्य वस्तू आहेत असा हा नवा विचार आहे ज्यामुळे जाहिरातींचे महत्त्व अनन्यसाधराण झाले आहे.

Translated by Mr. Sanjay Ranade,
Dept Of Communication and Journalism,
University of Mumbai
अधिक माहितीसाठी वाचा:
Vanita Kohli-Khandekar, The Indian Media Business, Second Edition, Response Books, Division of Sage Publications, 2006.
Robin Jefferey, India’s Newspaper Revolution, OUP.
Curran, J and Seator, J (1997), Power Without Responsibility, 6th edition, Routledge.
Franklin, B (1997), Newszak and News Media, London, Arnold.
Herman, E and Chomsky, N (1988, 1994) Manufacturing Consent: ‘The Political Economy of the Mass Media, New York, Pantheon.
Meyer, P (1987), Ethical Journalism, Lanham, MD; University Press of America.
Norms for Journalists laid down by the Press Council of India.