Tuesday, March 30, 2010

'जाहिरात करणे'-ऍड्व्हर्टायझिंग (Advertising)

'जाहिरात करणे'-ऍड्व्हर्टायझिंग (Advertising) महसूलाशिवाय धंदा नाही. वर्तमानपत्रे, नियतकालिके, सार्वजनिक असो वा खाजगी प्रसारण सेवा, सगळ्यांना महसूल हवाच. माध्यम संस्थांसाठी जाहिराती हे महसूलाचे मुख्य स्रोत आहे. 2004 ते 2005 या वर्षादर्म्यान जगभरातील गुंतवणुकदारांनी भारताच्या माध्यम आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात वीस अब्ज रुपये एवढी रक्कम गुंतवली. याचे कारण असे की आज भारत माध्यम आणि मनोरंजनाच्या क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. याची काही विशिष्ट कारणे आहेत. आपल्याकडे लोकशाही व्यवस्था आहे. आपली घटना प्रत्येक भारतीय नागरिकाला जाहीर मतप्रदर्शनाचा अधिकार देते. हा अधिकार आजही लोक वापरतात. भारतात सामाजिक आणि राजकीय बाबतीत लोकांमध्ये जागृती वाढते आहे. शिक्षणाचा प्रसार होत आहे त्यामुळे लोकांमध्ये आपल्या भोवतीचे वास्तव जाणून घ्यायचा ध्यास आहे. मध्यम वर्गाची वाढ होते आहे ज्यामुळे खर्च करायची क्षमताही वाढत आहे. माहिती तंत्रज्ञानात होणार्याी संशोधनामुळे माध्यम क्षेत्र अधिकाधिक समृद्ध आणि सक्षम होत आहे.
जाहिरातदार आणि पत्रकार यांच्यातला संघर्ष पारंपरिक आहे. दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नाही आणि दोघे एकमेकांवर कुरघोडी करत राहतात. माध्यमांच्या जाहिरातदारांवरील अवलंबितेमुळे उत्पादन आणि वितरण या दोन्ही क्षमतांवर परिणाम होतो. यामुळे महसूलासाठी आणि उद्योगात वाढ होण्यासाठी जाहिरातींवर भर द्यावा लागतो. मात्र याचा परिणाम पत्रकारितेच्या नैतिकतेवर होणार नाही, पत्रकारांच्या कर्तव्य बजावण्यावर होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते.
पत्रकार आणि जाहिरातदार यांच्यातील संघर्ष जाहीर होत नाही तर सूक्ष्म पातळीवर होत असतो. या संघर्षाचे पडसाद माध्यमांच्या प्रशासनावर पडतात तसेच सत्तेसाठी माध्यम संस्थांत होणार्यां साठमारीवर आणि माध्यमांतर्गत संघर्षावरही उमटतात.
एवढे मात्र खरे की जाहिरातींशिवाय आधुनिक माध्यमे मोठ्या संख्येपर्यंत पोहोचू शकत नाही. जाहिरातींमुळेच आज भारतातील वर्तमानपत्रांची किंमत सामान्य वाचकांच्या आवाक्यात आहे. लोकशाहीची तत्त्वे रुजवण्यात आणि जपण्यात जसा पत्रकारांचा वाटा आहे तसाच तो जाहिरातदारांचाही आहे कारण जी माध्यमे पत्रकार वापरतात ती माध्यमे सुरळीत चालवायला जाहिराती लागतात. पत्रकारांनी आणि जाहिरातदारांनी जर आपली नैतिकता सोडली नाही आणि समाजाप्रती आपली कर्तव्ये काय आहेत याची जाणीव ठेवली तर ते समाजाच्या दृष्टीने हितकारक होते मात्र यातील एकाने नैतिकतेचे आणि कर्तव्याचे भान सोडले तर समाजाचे नुकसान होते.
जाहिराती आणि प्रसार माध्यमे यांचा संबंध आता खूपच बदलला आहे. पूर्वीप्रमाणे आता एक वर्तमानपत्र दुसर्याध वर्तमानपत्राशी किंवा वर्तमानपत्रांशीच केवळ स्पर्धा करत नाही तर माध्यमांतर्गत स्पर्धा ही होत असते. म्हणजे वर्तमानपत्रे, टी.व्ही चॅनल्स, नीयतकालिके, रडिओ, इंटर्नेट या सर्व माध्यमांमध्ये स्पर्धा होत असते. जाहिरातदार जाहिरातीसाठीचा वार्षिक खर्च ठरवताना कुठल्या माध्यमाला किती जाहिराती द्यायच्या आणि मग त्या त्या माध्यमातील कुठल्या माध्यम संस्थेला किती जाहिराती द्यायच्या हे ठरवतात. अनेक आवृत्त्या आणि अनेक माध्यमं यांमुळे विपणन आणि वितरण यांना खूप महत्त्व आलं आहे. बातम्या ह्या केवळ वाचनीय नसून उपभोग्य वस्तू आहेत असा हा नवा विचार आहे ज्यामुळे जाहिरातींचे महत्त्व अनन्यसाधराण झाले आहे.

Translated by Mr. Sanjay Ranade,
Dept Of Communication and Journalism,
University of Mumbai
अधिक माहितीसाठी वाचा:
Vanita Kohli-Khandekar, The Indian Media Business, Second Edition, Response Books, Division of Sage Publications, 2006.
Robin Jefferey, India’s Newspaper Revolution, OUP.
Curran, J and Seator, J (1997), Power Without Responsibility, 6th edition, Routledge.
Franklin, B (1997), Newszak and News Media, London, Arnold.
Herman, E and Chomsky, N (1988, 1994) Manufacturing Consent: ‘The Political Economy of the Mass Media, New York, Pantheon.
Meyer, P (1987), Ethical Journalism, Lanham, MD; University Press of America.
Norms for Journalists laid down by the Press Council of India.

No comments:

Post a Comment