(Audience) ऑडियंस – प्रेक्षक: वर्तमानपत्रांचे वाचक, आकाशवाणीचे श्रोते आणि दूरदर्शन आणि इंटर्नेटचे श्रोते-प्रेक्षक या सगळ्यांना ‘प्रेक्षक’ ही संज्ञा लागू होते. अनेक अभ्यासकांनी पत्रकार आणि प्रेक्षक यांच्यातील नात्याचा अभ्यास केला आहे. गांस (1980), श्लेसिंजर (1987), हॅरिसन (2000), लांस बेनेट, मिंडिच इत्यादींच्या अभ्यासावरून असे लक्षात येते की पत्रकार आणि प्रेक्षक आणि माध्यम संस्था आणि प्रेक्षक यांचे नाते वेगवेगळे असते. त्याचबरोबर माध्यमे आणि प्रेक्षक एकमेकांवर परिणाम करतात. पत्रकार हे प्रेक्षकांकडे संख्यात्मक दृष्टिने पाहत नाहीत तर गुणात्मक दृष्टिने पाहतात. त्यामुळे प्रेक्षक कुठल्या विचारसरणीचे आहेत, त्यांची भावात्मक, राजकीय, सामाजिक व नैतिक घडण कशी आहे इत्यादींचा विचार पत्रकार जास्त करतात. याउलट माध्यम संस्था हे प्रेक्षकांकडे संख्यात्मक दृष्टीने पाह्तात. यामुळे कधीकधी माध्यम संस्था आणि पत्रकार यांच्यात संघर्ष निर्माण होतो. उदाहरणार्थ संपादकीय धोरणामुळे जर पाच टक्के प्रेक्षकांनी वर्तमानपत्र बदलले किंवा दूरचित्रवाणीची वाहिनी बदलली तर माध्यम संस्थेतील व्यवस्थापन संपादकीय विभागाला आपले धोरण बदलण्याचा आग्रह धरु शकते. त्याउलट संपादकीय विभाग असे म्हणेल की ज्याअर्थी पंच्याण्णव टक्के लोकांनी तेच वृत्तपत्र किंवा वाहिनी कायम ठेवले आहेत त्याअर्थी लोकांना बदलले संपादकीय धोरण मान्य आहे व तेच कायम ठेवावे.
वाचकांची पत्रे, एसएमएस, ईमेल इत्यादींद्वारे पत्रकार व माध्यमे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव आणि विचारांची दिशा पडताळून पाहत असतात. प्रेक्षकही आपली मते माध्यमांपर्यंत पोहोचवत असतात. जे लोकहिताचे असते ते नेहमीच सर्व लोकांच्या पचनी पडणारे नसते आणि लोकांना जे आवडते ते नेहमीच हिताचे नसते. यामुळे लोकहित जपावे की लोकांची आवडनिवड पुरवावी असा प्रश्न पत्रकार आणि माध्यम संस्थांना सतावत असतो व त्यांच्यामधील संघर्षाचे कारणही होतो.
या संघर्षातूनच दोन प्रक्रिया सुरू होतात. एक आहे audience fragmentation किंवा प्रेक्षकांचे अंशीकरण आणि दुसरी आहे audience segmentation किंवा प्रेक्षकांचे विभाजन. प्रेक्षकांपुढील माध्यमांचे अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे प्रेक्षक कुठल्याही एका माध्यमाचे किंवा माध्यम उत्पादनाचे अंशत:च ग्राहक होतात. अशामुळे जाहिरातदाराला केवळ वाचक संख्या किंवा प्रेक्षक-श्रोत्यांची संख्या यावरून आपली जाहिरात किती जणांपर्यंत पोहोचली हे सांगता येत नाही. यावर उपाय म्हणून जाहिरातदार विविध माध्यमांतून आणि माध्यम उत्पादनांतून आपल्या जाहिरातीचा मारा करतात.
त्याचबरोबर असेही आढळले आहे की प्रेक्षक हे सुप्त ग्राहक नव्हेत. ग्राहकांच्या सामाजिक, राजकीय, पारिवारिक, आर्थिक परिस्थितीचा परिणाम ते जे माध्यम आणि माध्यम उत्पादन निवडतात यावर पडतो व त्यानुसार प्रेक्षकांचे विविध सामाजिक, राजकीय, आर्थिक इत्यादी गटात विभाजन शक्य होते. असे विभाजन केल्यास कुठल्या वस्तूच्या जाहिराती कुठे जास्त प्रमाणात द्याव्यात हा निर्णय घेणे सोपे जाते.
आज प्रेक्षकांचे अंशीकरण आणि विभाजन करणे हे शिस्तबद्ध पद्धतीने विपणन शास्त्र आणि व्यवस्थापन शास्त्रात शिकवले जाते.
अधिक माहितीसाठी वाचावे:
Allan, S. (1999) News Culture Buckingham: Open University Press.
Gans, H J (1980) Deciding What’s News.
Harrison, J (2000) Terrestrial TV News in
Schlesinger, P (1987) Putting Reality Together,
W Lance Bennett (2006), News: The Politics of Illusion, Longman.
David Mindich (2005), Tuned Out: Why Americans Under 40 Don't Follow the News, OUP.
No comments:
Post a Comment